

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चोर समजून तिघांनी मिळून एका कामगाराला बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी नऊच्या सुमारास रसिकवाडी, जांबे येथे उघडकीस आली. राजू यादव (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वैभव पंडित गायकवाड (24, रा. जांबे, ता. मुळशी), समाधान परमार, निखिल जैसवाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजू यादव हे बिगारी काम करतात. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री ते रस्त्याने चालत घरी जात होते. त्यावेळी जांबे गावातील रसिकवाडी येथे आल्यानंतर आरोपींनी राजू यांना चोर समजून बेदम मारहाण केली. यामध्ये राजू गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात न नेल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप देशमुख तपास करीत आहेत.