

पुणे, पुढारी वृत्तसेवा: प्रायोगिक रंगभूमीवरही अनेक नवीन नाटकांची भर पडत असून, त्यात ज्येष्ठ रंगकर्मींबरोबरच आता युवा कलाकारही आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकत आहेत. विशेषत: संहितेपासून अभिनयापर्यंतची संपूर्ण जबाबदारी युवा कलाकार पेलत असून, त्यांची प्रायोगिक नाटकेही रंगभूमीवर गाजत आहेत. त्यांच्या नाटकांतून युवा पिढीच्या भावविश्वातील विषय हाताळले जात आहेत.
मुंबईसह आता पुणे हे प्रायोगिक रंगभूमीसाठी महत्त्वाचे केंद्र बनले आहे. पुण्यात होणार्या प्रायोगिक नाट्यप्रयोगांची संख्याही वाढत आहे. अशा प्रायोगिक नाटकांमध्ये काम करणार्या कलाकारांमध्ये युवा कलाकारांचीही कमतरता नाही. शिवराज वायचळ, पर्ण पेठे, आलोक राजवाडे, धर्मकिर्ती सुमंत, सूरज पारसनीस, कृतार्थ शेवगावकर, राहुल लामखडे असे कलाकार प्रायोगिक रंगभूमी गाजवत आहेत.
ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे म्हणाले, प्रायोगिक रंगभूमीला चांगले दिवस नक्कीच आले आहेत. विशेष म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर काम करणार्या नव्या दमाचे कलाकार अतिशय सुंदर काम करत आहेत. ते मोठ्या जोमाने काम करत आहेत. युवा कलाकार राहुल लामखडे म्हणाले, पुणे हे प्रायोगिक नाटकांचे केंद्र आहे. त्यामुळे येथे होणार्या नाटकांची संख्या मोठी आहे.
येथे प्रायोगिक नाटकांसाठी असलेला प्रेक्षकवर्गही मोठा असून, आम्ही 'वाफाळलेले दिवस' या नाटकाचे अनेक प्रयोग पुण्यात केले आहेत. आमच्या नाटकांच्या टीममध्ये सगळेच युवा कलाकार असून, युवा कलाकार नाटकांमधील सर्व जबाबदारी पेलत आहेत.
प्रायोगिक रंगभूमीवर 7 ते 8 नवीन नाटकांची भर पडली आहे. आमचे सर्व प्रश्न अनिवार्य असल्याने या नाटकाचे प्रयोग चालू आहेत. त्याला प्रतिसाद चांगला आहे. लवकरच एक नवीन नाटकही येणार आहे. त्याची संहिता लिहून झाली आहे. प्रायोगिक नाटकांसाठीचा चाहता वर्ग पुण्यात मोठा आहे. त्यामुळेच नवीन नाटकेही रंगभूमीवर येत आहेत.
– कृतार्थ शेवगावकर,युवा कलाकार