पिंपरी : यशातील सातत्य कायम ! यंदाही मुलीच अव्वल | पुढारी

पिंपरी : यशातील सातत्य कायम ! यंदाही मुलीच अव्वल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च/एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या
इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 17) ऑनलाइन जाहीर झाला. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 97.73 टक्के इतका लागला. या वर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्णात 98.39 टक्के मुलींचे प्रमाण असून, 97.17 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

शहरामध्ये दहावीच्या परीक्षेस एकूण 19594 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 10616 मुले आणि 8978 मुली परीक्षेस बसल्या होत्या. यापैकी 19150 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 10316 मुले आणि 8834 मुली उत्तीर्ण झाल्या. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या दहावीचा शहराचा निकाल 99.92 टक्के लागला होता.

तसेच शहरातील चिंतामणी रात्र प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला आहे. बधीर मूक शाळेचा निकाल 100 टक्के लागला. पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अधंशाळा भोसरी व जागृती अंध मुलींची शाळेचा 100 टक्के निकाल लागला. याबरोबरच शहरातील 127 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.

निकाल पाहिल्यावर जल्लोष
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (दि. 17) दुपारी एक वाजता इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईलमुळे विद्यार्थ्यांनी घरीच निकाल पाहिला. निकाल पाहिल्यानंतर मित्र-मैत्रिणींनी जल्लोष केला. अनेक विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आपला निकाल काय लागला असेल, याविषयी भीती दिसून येत होती; मात्र थोड्याच वेळात निकाल पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.

काही विद्यार्थ्यांनी मोबाईल किंवा लॅपटॉपवर आधीच निकाल पाहिला. पण निकालाची प्रिंट मिळविण्यासाठी शाळेमध्ये आले होते. यानिमित्ताने त्यांना मित्रमैत्रिणींचा भेट घेता आली. निकालाची प्रिंट हातात पडल्यावर कोणाला किती मार्कस पडले. कोणत्या शाखेला, कुठे प्रवेश घेणार याबाबत चर्चा रंगली होती. इतके दिवसाचे शालेय जीवनातील मित्र मैत्रिणी आता कोणकोण वेगवेगळ्या शाखेमध्ये प्रवेश घेतल्यामुळे आता पुन्हा शाळेसारखी रोज रोज भेट होणार नसल्याने काहींनी एकत्र सेलिब्रेशन केले. काहीजण सेल्फी काढण्यात दंग झाले होते. बरोबर आलेल्या पालकांच्याही चेहर्‍यावर समाधान दिसत होते. निकाल पाहिल्यानंतर काहींनी आपले नातेवाईक व मित्र-मैत्रिणींना फोन करून आनंद व्यक्त केला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

पालिकेच्या शाळांचा निकाल 89 टक्के
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिकच्या अठरा शाळांचा इयत्ता दहावीचा निकाल 89 टक्के एवढाव लागला. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल 94.11 टक्के इतका लागला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात घट झाली आहे. महापालिकेच्या संत तुकारामनगर, खराळवाडी, नेहरूनगर, क्रीडा प्रबोधिनी, लांडेवाडी, भोसरी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपरीनगर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड, थेरगाव, केशवनगर, आकुर्डी, काळभोरनगर, रुपीनगर, श्रमिकनगर या 18 शाळांचे मिळून 2 हजार 180 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 1932 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पालिकेच्या खराळवाडी, क्रीडाप्रबोधिनी, पिंपरीनगर या 3 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी 90 ते 100 टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये, 85 ते 89.99 टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना 50 हजार आणि 80 ते 84.99 टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना 25 हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येते. यंदा पालिकेचे 18 विद्यार्थी लाखाचे मानकरी ठरले आहेत. तर 50 हजाराचे 40 विद्यार्थी, 25 हजाराचे 73 विद्यार्थी मानकरी ठरले आहेत.

Back to top button