पुणे : संतोष जाधवचा ‘मोठा प्लॅन’ ? पोलिसांनी केला शस्त्रसाठा जप्त | पुढारी

पुणे : संतोष जाधवचा 'मोठा प्लॅन' ? पोलिसांनी केला शस्त्रसाठा जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येतील संशयित आरोपी संतोष जाधव याच्याकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठा शस्त्रसाठा जप्त केल्या आहे. त्यामध्ये तब्बल 13 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. मागील आठवड्यात जाधव याला गुजरात राज्यातून अटक करण्यात आली होती. एका खंडणीच्या संदर्भात केलेल्या तपासात हा साठा सापडला.

घटनेची पार्श्वभूमी अशी की,  इंदीरानगर, ता. जुन्नर, येथील वॉटर प्लांट व्यावसायिक असलेल्या फिर्यादीला  ५ ते ६ महिन्यापुर्वी गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या संतोष जाधव याने व्हॉट्स ॲप व्हॉईस कॉल करून ५० हजार रूपये हप्ता मागितला होता. याशिवाय हप्ता दिला नाही तर गोळया घालून मारून टाकण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी घाबरलेल्या फिर्यादीने कोणतीही तक्रार त्यावेळी दिली नाही.

त्यानंतर पुन्हा जाधव याने पुन्हा एकदा फिर्यादीस व्हॉट्स ॲप कॉल करून ५० हजार रूपयांची मागणी केली होती. परंतु या दरम्यान संतोष सुनिल जाधव यास पोलिसांनी पकडल्याची बातमी ऐकल्यानंतर तक्रारदार यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे  घडलेल्या घटनेची सविस्तर तक्रार दिली. त्यावरून संतोषवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला.

त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग श्री. मितेश घट्टे यांच्या पथकाने मंचर पोलीस स्टेशनच्या  खुनासह मोक्का गुन्हयात अटकेत असलेले आरोपी संतोष सुनिल जाधव याने खंडणी मागण्याकरीता कोणास पाठविले होते याची माहिती घेऊन जिवनसिंग दर्शनसिंग नहार, वय २३ वर्षे, रा. मंचर व श्रीराम रमेश थोरात, वय ३२ वर्षे, रा. मंचर यांना अटक केली त्यावेळी जिवनसिंग नहार याचेकडून १ गावठी पिस्टल व २ मोबाईल फोन तसेच श्रीराम थोरात याचेकडून १ गावठी पिस्टल व १ मोबाईल फोन जप्त करून मा. न्यायालयासमक्ष त्यांना हजर केले. या दोघांनाही  ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

त्यादरम्यान त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी सांगितले की, संतोष जाधव याने जयेश रतीलाल बहिराम, वय २४ वर्षे, रा घोडेगाव व त्याचे साथीदारास मनवर, मध्यप्रदेश येथे गावठी पिस्टलचा साठा आणण्यासाठी पाठविले होते. त्याप्रमाणे त्यांनी गावटी पिस्टल आणल्यानंतर संतोष जाधव याने सांगितल्याप्रमाणे वैभव ऊर्फ भोला शांताराम तिटकारे, वय १९ वर्षे, रा. जळकेवाडी, चिखली, रोहीत विठ्ठल तिटकारे, वय २५ वर्षे, रा. सरेवाडी, नायफड, सचिन बबन तिटकारे, वय २२ वर्षे, रा. धाबेवाडी, नायफड, जिशान इलाईबक्श मुंढे, वय २० वर्षे, रा. घोडेगाव, जिवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात आणि एक अल्पवयीन यांनी मिळून खंडणी उकळण्याचा कट केला. जीवनसिंग नहार, श्रीराम थोरात व एक अल्पवयीन यांचा खंडणी वसूलीत सहभाग असल्याच समोर आलं.

त्यानंतर जयेश बहिरम याची घरझडती घेतली असता त्याचे कब्जात ५ गावटी पिस्टल व १ मोबाईल अशा वस्तू सापडल्या. जयेशने जिशान यालाही एक गावठी पिस्तूल दिल असल्याच निष्पन्न झालं आहे.

त्यानुसार जिशान मुंढे याचेकडून १ गावठी पिस्टल व १ मोबाईल फोन जप्त केला, वैभव ऊर्फ भोला शांताराम तिटकारे याचेकडे १ गावठी पिस्टल दिल्याची माहिती दिली त्यावरून वैभव ऊर्फ भोला तिटकारे याचेकडून १ गावठी पिस्टल व १ मोबाईल जप्त केला, सचिन बबन तिटकारे याचेकडे १ गावठी पिस्टल दिल्याची माहिती दिली त्यावरून सचिन तिटकारे याचेकडून १ गावठी पिस्टल व १ मोबाईल फोन हस्तगत केला, रोहीत तिटकारे याचेकडे ३ गावठी पिस्टल, १ मॅक्झीन, १ बुलेट कॅरीयर दिल्याची माहिती दिली.

त्यावरून रोहीत तिटकारे कडून ३ गावठी पिस्टल, १ मॅक्झोन, १ बुलेट कॅरीयर, १ बॅग अशा वस्तु हस्तगत केल्या आहेत व त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत १३ गावठी पिस्टल, १ बुलेट कॅरियर व १ मॅक्झीन अशा वस्तु जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेली बोलेरो गाडी नं. एच. आर.०७ ए.डी.०६८५ ही देखील जप्त करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास चालू असून स.पो.नि.श्री. ताटे, नारायणगाव पोलीस स्टेशन हे गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत. यापुढे देखील पुणे ग्रामीण पोलीसांकडून संतोष जाधव याचे संपर्कात असलेल्या मुलांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

पुणे ग्रामीण पोलीसांकडून संतोष जाधव याने अगर त्याचे नावाने इतर कोणी खंडणीची मागणी केली असल्यास अथवा इतर काही तक्रार असल्यास त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे आवाहन करण्यात येत आहे

Back to top button