ओतूर : ओतूर गावाकुसाच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्या दिसल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र बुधवारी १५ जुने रोजी पहाटे गावठाण हद्दीतील ५२ गल्ली (शिवाजी रोड) वर खुलेआम बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे येथील चंद्रकांत उंबरे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यानंतर लगेचच शिवाजी रोडचे रहिवाशी अनिल बाजीराव डुंबरे पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून खात्री केली असता बुधवारी पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या मांडवी नदीच्या बाजूने गस्त गल्लीतून शिवाजी रोड येथील ५२ गल्लीत आला.
काही वेळ गल्लीत थांबून तो पुन्हा दुसऱ्या शेजारच्या बखळ जागेतून पुन्हा गस्त गल्लीच्या दिशेने गेल्याचे व्हिडिओत दिसत आहे. चंद्रकांत उंबरे यांनी देखील बिबट्याचा प्रत्यक्ष थरार अनुभवला आहे. ज्या वेळी समोर बिबट्या अवतरला, त्यावेळी अंगणातील चुलीसमोर अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी चंद्रकांत हे बसले होते. अचानक बिबट्या समोर दिसल्याने त्यांनी ओरडतच घरात धूम ठोकली.
शिवाजी रोडवरील मांडवी नदीच्या बाजूच्या गस्त गल्ली परिसरात डुकरे व भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त आहे. अलीकडच्या काळात नियमित दिसणारी डुकरे व कुत्रीदेखील गायब झाल्याचे निदर्शनास येते. सीसीटीव्ही फुटेज व भटक्या प्राण्यांची कमी झालेली संख्या पहाता बिबट्याचा या परिसरात दररोज फेरफटका होत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी सायंकाळी ६ नंतर व पहाटे दक्षता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.