निरा : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील निरा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये ६६ लाख रूपयांचा विदेशी दारूच्या साठ्यासह एकूण ९१ लाख ७७ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे भरारी पथक क्रमांक दोनच्या पथकाने केली.
बुधवारी (दि. १५) राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पुरंदर तालुक्यातील निरा गावच्या हद्दीत निरा-लोणंद रस्त्याने गोवा राज्यात विक्री असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती समजली. त्या अनुषंगाने निरा गावच्या परिसरातील या रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक क्रमांक २ यांनी सापळा लावला. दरम्यान यावेळी भारत बेंज कंपनीचा ट्रक त्यांना दिसून आला. यावेळी पथकाने हा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्य व बिअरचा साठा मिळाला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.
ट्रक चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय २३, रा. तांबोळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंग बी. राजपूत, उपअधीक्षक संजय आर. पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. या गुन्ह्याचा तपास निरीक्षक तानाजी शिंदे हे करीत आहेत.