बारामती : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानाजवळील झाडे तोडणे दोघांना चांगलेच महागात पडले. याप्रकरणी पांडूरंग माने व दिलीप बाबुराव जगदाळे या दोघांविरोधात शहर पोलिसांनी चोरीसह महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
पोलिस कर्मचारी संतोष वाबळे यांनी याबाबत फिर्याद दिली. वाबळे हे सहयोग सोसायटी या बंगल्यावर सुरक्षेचे काम करतात. दि. १० रोजी सकाळी ते बंगला परिसराची पाहणी करत असताना संरक्षक भिंतीच्या आत लावलेल्या झाडाच्या फांद्या कुऱ्हाडीने तोडल्या जात होत्या. यावेळी वाबळे यांनी विचारणा केली असता फांद्या तोडणाऱ्याने स्वतःचे नाव पांडूरंग माने (रा. बारामती) असे सांगितले. दिलीप जगदाळे यांच्या सांगण्यावरून फांद्या तोडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी तेथे २० ते २५ झाडांच्या फांद्या तोडल्या होत्या. त्या ते घेऊन जात होते. कोणाला विचारून फांद्या तोडल्या, कोणाची परवानगी घेतली, अशी विचारणा फिर्यादीने केली असता त्यांनी उत्तर देणे टाळले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे निसर्गप्रेमी म्हणून ओळखले जातात. वृक्ष लागवड व जतन याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. प्रत्येक भाषणात ते झाडे लावण्याचा सल्ला देतात. त्यांच्यात बंगल्याच्या परिसरात झाडे तोडण्याचे धाडस कसे करण्यात आले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.