पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'राहुल गांधी यांना सलग तीन दिवस 'ईडी'च्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावून त्यांच्या अटकेसाठी मार्ग तयार केला जात आहे,' असा आरोप करत शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील पुतळ्याजवळ करण्यात आलेल्या या आंदोलनात माजी शहराध्यक्ष रमेश बागवे,
अॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, संगीता तिवारी, पूजा आनंद, गोपाळ तिवारी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 'येणार्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशाचे नेतृत्व राहुल गांधी करतील. या भीतीमुळेच नॅशनल हेरॉल्ड या चुकीच्या प्रकरणामध्ये मुद्दाम नाव बदनाम करून खोट्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नरेंद्र मोदी हे राहुल गांधींना घाबरत आहेत,' असा आरोप यावेळी शिंदे यांनी केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) दबाब आणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा