पिंपरी : साहित्याविना विद्यार्थ्यांचा पहिला दिवस | पुढारी

पिंपरी : साहित्याविना विद्यार्थ्यांचा पहिला दिवस


पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या शिक्षण विभागाचा गलथान कारभार, तसेच ठेकेदारांसोबतच्या वादामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या हजारो गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शालेय साहित्य मिळाले नाही. प्रशासकीय राजवटीतही पूर्वीसारखीच परिस्थिती असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या बालभारतीमार्फत मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जातात. ती पालिकेला वेळेत उपलब्ध झाली. या व्यतिरिक्त पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गणेवश, पी. टी. गणवेश, बूट, मोजे, दप्तर, कंपास, स्वेटर, वह्या, अक्षरलेखन पुस्तक, चित्रकलावही, प्रयोगवही, भूगोलवही, नकाशा, स्वाध्यायमाला, ग्रंथालयासाठी पुस्तके आदी विविध शालेय साहित्य दिले जाते.

या साहित्य खरेदीवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र, मागील काही वर्षांपासून शालेय साहित्य खरेदी वादाचा विषय ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीमध्ये साहित्य दिले जात नाही. यंदा मोठ्या प्रतिक्षेनंतर शाळा वेळेवर सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना साहित्य देणे अपेक्षित होते.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. इतर शालेय साहित्य देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच निर्णय होऊन कार्यवाही केली जाईल.
-संदीप खोत,
उपायुक्त, शिक्षण विभाग

खरेदीबाबत केवळ कागदी घोडे
पालिका व ठेकेदार यांच्यातील वादामुळे यावर्षी प्रशासकीय राजवट असतानाही शालेय साहित्य खरेदी अद्याप झालेली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळालेले नाही. दुसरीकडे, पालिका शिक्षण विभाग खरेदीबाबत केवळ कागदी घोडे नाचवत आहे. ठोस निर्णय न घेतल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांकरिता साहित्य खरेदी करण्याचा विचार सुरू आहे. परंतु, त्यावरही शिक्कामोर्तब झाले नसून, शिक्षण विभाग पुर्णपणे गोंधळाच्या अवस्थेत आहे.त्याबाबत उडवाउडवीचे उत्तरे दिले जात आहेत.

Back to top button