पिंपरी : आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील दुसरा टप्पा सुरू | पुढारी

पिंपरी : आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील दुसरा टप्पा सुरू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 आरटीईसाठी 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादीतील दुसर्‍या टप्प्यातील प्रवेशास मंगळवार (दि.14) पासून सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात येत आहे.

पहिल्या यादीत प्रवेश न झालेल्या पाल्यांच्या पालकास दुसर्‍या यादीची प्रतीक्षा होती. आरटीईच्या दुसर्‍या टप्प्यातील प्रवेशास सुरुवात झाली आहे. मात्र, बहुतांश पालकांना मेसेज न आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दुसर्‍या टप्प्यातील प्रवेशाची मुदत 14 ते 21 जूनपर्यंत दिलेली आहे.

दाऊदची धमकी देत ७५ वर्षीय व्यावसायिकाचा ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार

त्यामुळे ज्या पाल्यांचा पहिल्या यादीत प्रवेश झालेला नाही आणि दुसर्‍या टप्प्यातील प्रवेश यादीत नाव आले आहे, अशा पालकांनी ताबडतोब पाल्याचा प्रवेश घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात सुरू आहे.

आरटीईसाठी 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यस्तरीय प्रवेश सनियंत्रण समितीच्या 2 जून रोजी झालेल्या बैठकीत प्रतीक्षा यादीतील दुसर्‍या टप्प्यातील बालकांचा प्रवेश निश्चित करण्याकरिता 10 जूनपासून पुणे, मुंबई, नांदेड वगळून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. 14 जूनपासून वगळलेल्या जिल्ह्यामध्ये दुसर्‍या टप्प्यातील प्रवेश यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Back to top button