मावळातील 23 गावे स्मशानभूमीविना

मावळातील 23 गावे स्मशानभूमीविना
Published on
Updated on

कामशेत : पुढारी वृत्तसेवा : मावळातील 23 गावांमध्ये अधिकृत स्मशानभूमीची सोय नसल्याची माहिती पंचायत समितीने केलेल्या पाहणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार, आंदर मावळ, नाणे मावळ आणि पवन मावळातील येवलेवाडी, जवण, शिरे, पानसोली, देशमुखवाडी, कुंडमळा, इंगळून, कुणेवाडी, अनसुटे, कांब्रे, लोखंडवाडी, उंबरवाडी, कोंडिवडे, धालेवाडी, प्रभाचीवाडी, मळवली, साई, नाणोली, जांभवली, ठाकूरसाई गावठाण, उधेवाडी, राजमाची, पांगोळीली या गावांमध्ये स्मशानभूमीचा अभाव आहे.

या गावांमध्ये अधिकृत आणि सोईच्या ठिकाणांवर स्मशानभूमीची सोय नसल्याने अंत्यसंस्कारांचे विधी खासगी जागेत उघड्यावरच करावे लागत असल्याची माहिती गावकर्‍यांनी दैनिक 'पुढारी' प्रतिनिधीला दिली.

पंचायत समितीने टाटा कंपनीकडे जागेसाठी पसरले हात

याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. ते म्हणाले, की स्मशानभूमीसाठी लागणारी विशिष्ट ठिकाणची जागा उपलब्ध होत नसल्याने तसेच वनखात्याच्या ताब्यात असलेली सोयीची जागा देण्यास सतत नकार मिळत असल्याने या गावांमध्ये स्मशानभूमी बांधता येत नाही. जर जमीनमालक ग्रामस्थांनी सोयीच्या ठिकाणची जागा ग्रामपंचायतीस बक्षीसपत्र करून दिली, तर शासकीय अनुदानातून स्मशानभूमीचे काम करता येईल. काही गावांतील हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून पंचायत समितीतर्फे तालुक्यातील टाटा पॉवर कंपनीकडे जागा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली असल्याचे भागवत यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांत स्मशानभूमी नाही ही शोकांतिका असल्याची खंत काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. तालुक्यात काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्या, कार्यकर्त्यांना सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेची बांधकाम समिती ते आमदार अशी सत्ता मिळाली. मात्र एकाही राजकीय पक्षाने या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या प्रचारकाळात स्मशानभूमी पीडित ग्रामस्थांनी हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. काही गावांमधील जुन्या स्मशानभूमींची डागडुजी केली जाते, नव्याने बांधण्यात येणार्‍या बांधकामापेक्षा हा लाख़ो रुपयांचा जास्त खर्च केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. नवीन स्मशानभूमीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे हा प्रश्न कधी सुटणार? असा प्रश्न संबंधित गावातील गावकर्‍यांना पडला आहे.

अधिकृत स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार करायचे तरी कुठे ? रात्री-अपरात्री तसेच पावसाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. ऐन पावसाळ्यात अंत्यविधी करणे अवघड असते. कोणत्याही प्रकारचे शेड व सुविधा नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शासनाने लवकरात लवकर स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

– सोमनाथ येवले, येवलेवाडी ग्रामस्थ

 

मावळ तालुक्यातील काही गावांमध्ये स्मशानभूमीची समस्या आहे. कारण स्मशानभूमी बांधण्यासाठी लागणारी विशिष्ट ठिकाणची जागा उपलब्ध होत नाही. जे गायरान आहे ते गावापासून दूर आहे. काही जागा वनविभागाच्या ताब्यात असून वनविभाग स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देत नाही. जर ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी जागा बक्षीसपत्र करून दिली तर तिथे स्मशानभूमी बांधता येईल. त्यासाठी अनुदानही त्वरित मिळू शकते. आम्ही टाटा कंपनीकडे काही गावांच्या स्मशानभूमीसाठी जागा मिळावी म्हणून विनंती केली आहे.

– सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मावळ

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news