पीएमश्री योजनेत पुणे जिल्ह्यातील 23 शाळा

पीएमश्री योजनेत पुणे जिल्ह्यातील 23 शाळा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील 23 शाळांची निवड झाली आहे. येत्या काळात या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास केला जाणार आहे. नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यांतील प्रत्येकी 26 शाळांची, तर सोलापूर जिल्ह्यातील 23 शाळांचा समावेश करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या उपसचिव डॉ. प्रीती मीना यांनी याबाबतचे पत्र नुकतेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांना पाठविले आहे. या पत्रात पीएमश्री योजनेसाठीचे निकष पूर्ण करणार्‍या, सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविल्या जाणार्‍या 426 प्राथमिक आणि 90 माध्यमिक अशा एकूण 516 शाळांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने पीएमश्री योजनेला 7 सप्टेंबर 2022 रोजी मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात राज्यातील 516 शाळांना मान्यता दिली आहे. या योजनेत येत्या वर्षात 1351 आयसीटी लॅब, 2040 डिजिटल लायब्ररी, 10,594 स्मार्ट क्लासरूम्स, 105 स्टेम लॅब, 533 टिंकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे 97 हजार 249 टॅब देण्यात येतील.

प्रत्येक शाळेला पाच वर्षांसाठी एक कोटी 88 लाख…

या योजनेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करणे; तसेच निष्पक्षता, प्रवेश, गुणवत्ता आणि समावेश या पातळ्यांवर सर्वसमावेशक, समर्पित समग्र परिवर्तन घडविण्याचा उद्देश आहे. या योजनेत देशात एकूण 14 हजार 500 शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. ही योजना पाच वर्षांसाठी राबविली जाणार असून, या अंतर्गत निवड झालेल्या शाळा आदर्श शाळांमध्ये रूपांतरित होणार आहेत. या योजनेत निवड झालेल्या शाळांसाठी 60 टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळणार असून, राज्य सरकारचा हिस्सा 40 टक्के असणार आहे. यासाठी राज्य सरकार प्रत्येक शाळेला पाच वर्षांसाठी एक कोटी 88 लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news