

शिवाजी शिंदे/आशिष देशमुख
पुणे : राज्यात यंदा पावसाने सर्वच भागांत जोरदार हजेरी लावल्याने महाराष्ट्र सलग दुसर्या वर्षी दुष्काळमुक्त ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा 4 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा 19 टक्के अधिक, तर यंदा सरासरीपेक्षा 24 टक्के अधिक पाऊस पडला आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात 61 टक्के इतका झाला आहे. तर सर्वात कमी सांगली जिल्ह्यात उणे 20 टक्के पाऊस झाला आहे. मात्र, एकही जिल्हा दुष्काळग्रस्त नाही. यंदा राज्यात जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट दिसू लागले होते.
मात्र, जुलैच्या दुसर्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात सलग कमी दाबाचे पट्टे तयार झाले. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागले. परिणामी, याच काळात पावसाने अधिक जोर धरला तो सप्टेंबरअखेर सुरूच आहे. त्यामुळे यंदा एकही जिल्हा दुष्काळग्रस्त राहिला नाही. राज्यातील 36 जिल्ह्यांत सरासरी 25 टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 61 टक्के, मध्य महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात 34 टक्के, कोकणात पालघर जिल्ह्यात 35 टक्के, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात 46, तर विदर्भात वर्धा 56 आणि नागपूरमध्ये 55 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
एकही जिल्हा दुष्काळी नाही
राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत एकही जिल्हा अवर्षणग्रस्त नाही. केवळ चार जिल्ह्यांतच सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला
आहे. मात्र, ते जिल्हे रेड झोनमध्ये नाहीत. फक्त मुंबई शहर उणे 8 टक्के, सांगली जिल्ह्या उणे 20 टक्के, हिंगोली जिल्हा उणे 11 टक्के, तर अकोला जिल्हा उणे 3 टक्के इतका पाऊस झाला आहे.
कोकणात घटला; विदर्भ, मराठवाड्यात वाढला
राज्यात दरवर्षी कोकण विभागात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडतो. मात्र, यंदा विदर्भाने बाजी मारली आहे. या भागात सरासरीच्या 31 टक्के अधिक, तर मराठवाड्यात 24 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात 26 टक्के अधिक पाऊस पडला. कोकणात केवळ सरासरीच्या तुलनेत 9 टक्के अधिक पाऊस पडला आहे.
कोकणात घटला; विदर्भ, मराठवाड्यात वाढला
राज्यात दरवर्षी कोकण विभागात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडतो. मात्र, यंदा विदर्भाने बाजी मारली आहे. या भागात सरासरीच्या 31 टक्के अधिक, तर मराठवाड्यात 24 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात 26 टक्के अधिक पाऊस पडला. कोकणात केवळ सरासरीच्या तुलनेत 9 टक्के अधिक पाऊस पडला आहे.
राज्यात सर्वात कमी पावसाचे जिल्हे
सांगली 20 टक्के उणे
हिंगोली 11 टक्के उणे
मुंबई 8 टक्के उणे
अकोला 5 टक्के उणे
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यांनी सरासरी ओलांडली.
– अनुपम कश्यपी, हवामानशास्त्र प्रमुख,
पुणे वेधशाळाजुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत चांगल्या पावसाने हजेरी लावली. हा पाऊस राज्यातील पिकांसाठी चांगला असून, काही भागांत अतिपावसामुळे पिकांचे नुकसानदेखील झाले आहे. मात्र, या पावसामुळे रब्बी हंगाम चांगला होईल.
– डॉ. रामचंद्र साबळे,
हवामान अभ्यासक