आजाराचे वेळेत निदान न झाल्याने युवकाचा मृत्यू | पुढारी

आजाराचे वेळेत निदान न झाल्याने युवकाचा मृत्यू

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा :  डोंगरगण (ता. शिरूर) येथील सचिन बाळू चोरे (वय 23) याचे अल्पशा आजाराने निधन झाले. सचिन हा प्राथमिक शिक्षकाचा एकुलता एक मुलगा आणि व्यवसाय करणारा मितभाषी तरुण असल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे. त्याच्या आजाराचे योग्य निदान न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कळते.

सचिन याचे नेहमी डोके दुखत होते आणि तो शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला दिलेल्या जादा पॉवरच्या गोळ्यांमुळे त्याला तात्पुरते आजारातून बरे झाल्यासारखे वाटत असे, परंतु पुन्हा तसा त्रास झाला की तो परत उपचार घेत होता. परिणामी, या आजाराचे निदान झाले नाही. एक दिवशी सचिन यास अचानक चक्कर आली व त्यास रक्ताच्या उलट्या झाल्या.

त्याला पुणे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तोपर्यंत तो कोमात गेलेला होता. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्याच्या मेंदूत पाणी झाल्याचे व मध्यभागी गाठ तयार झाल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया केल्यानंतरदेखील त्याचा
मृत्यू झाला. त्याच्या पश्चात वडील बाळू, आई चंद्रभागा, बहीण काजल सुनील रोहिले असा परिवार असून, त्याच्या अचानक जाण्याने परिवारातील सर्व सदस्य दुःखात बुडाले आहेत.

Back to top button