पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या तिसर्या लाटेत फेब्रुवारी ते एप्रिल 2022 असे तीन महिन्यांत एकूण 11 हजार 480 किलो वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) जमा झाला. तो कचरा जमा करून त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने 10 लाखांचा खर्च केला आहे.
वैद्यकीय कचर्यांचे पालिका व खासगी रूग्णालयांतून संकलन करून त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पास्को इन्व्हायरमेटल सोल्युशन प्रा. लि. या एजन्सीची नियुक्ती केली आहे. कोरोनो मेडिकल वेस्ट प्रति किलो 87 रूपये दराने वाहतूक व निर्मूलन खर्चासहित अदा करण्यात येतो. हा दर पालिकेसह शासकीय व खासगी रूग्णालयांसाठी लागू आहे.
फेब्रुवारी ते एप्रिल 2022 या तीन महिन्यांच्या कालावधीत संबंधित एजन्सीने 11 हजार 480 किलो कोरोना मेडिकल वेस्ट संकलित करून त्यांची विल्हेवाट लावली आहे. त्यासाठी 9 लाख 98 हजार 791 रूपये खर्च झाला आहे. त्या खर्चास आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.