…आता काँटे की टक्कर! राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा अन् राज्यसभेच्या विजयामुळे भाजपला बळ | पुढारी

...आता काँटे की टक्कर! राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा अन् राज्यसभेच्या विजयामुळे भाजपला बळ

किरण जोशी:

पिंपरी : आ. लक्ष्मण जगताप यांनी आजारपणावर केवळ मातच केली नाही, तर थेट मुंबई गाठून राज्यसभेसाठी केलेले मतदान निर्णायक ठरल्याने शहर भाजपच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही. गेल्या काही महिन्यात आक्रमक पवित्रा घेतलेल्या राष्ट्रवादीमुळे बॅकफूटवर गेलेल्या भाजपला या विजयामुळे बळ मिळाल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेत सत्तेवर असणार्‍या भाजपवर तुटून पडण्यासाठी राष्ट्रवादीने पावले उचलत शिलेदारासह पदाधिकार्‍यांची आदलाबदल केली. याचदरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन झंझावाती दौरे काढून भाजपवर घणाघती टीका केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामांच्या निमित्ताने अखंड दिवस पिंपरी-चिंचवडला दिल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. काल (शनिवारी) दिवसभर अजित पवार यांचा शहरात दौरा होता. मात्र, कदाचित राज्यसभा मतमोजणीवेळी झालेल्या नाट्यमय घडामेडीमुळे तो रद्द झाला.

राष्ट्रवादीकडून भाजपची कोंडी
महापालिकेचा बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्यासाठी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीने महापालिकेतील भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराच्या दुखर्‍या नसेवर बोट ठेवले. भ्रष्टाचाराचा मद्दा पुढे करुन सत्तेत आलेल्या भाजपची याच मुद्यावर कोंडी करण्याची व्युहरचना राष्ट्रवादीने आखली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्षाच्या जुन्या-नव्यांना एकत्र आणून पिंपरी चौकात शिवसेना आणि काँग्रेससह मोठे आंदोलन केले. आघाडी सरकारच्या कारकिर्दीतील शहरातील हे लक्षवेधी आंदोलन ठरले. भाजपमध्ये एकाधिकारशाही असल्याचा आरोप करीत काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि राष्ट्रवादीने पुढला गिअर टाकला.

भाजप कार्यकर्त्यांना बळराज्यसभा निवडणुकीसाठी मागचा पुढचा कोणताही विचार न करता आमदार जगताप यांनी रुग्णवाहिकेतून थेट मुंबईला जावून मतदानाचा हक्क बजावला. त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती पाहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी त्यांना सॅल्युट केला. भाजपला विजयश्री मिळाल्याने आणि याचे श्रेय फडणवीसांनी जगतापांसारख्या लढवय्या आमदारांना दिल्याने शहर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शनिवारी भाजप कार्यालयामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज्यसभा निवडणुकीत आ. जगतापांच्या रुपाने पक्षाला मिळालेले योगदान लक्षात घेता आता विधानपरिषदेच्या उमेदवार उमा खापरे यांना विजश्री मिळून शहरातील पक्षाला नवी उभारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तितक्याच ताकदीने आमनेसामने
गेल्या काही महिन्यांतील या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी तितक्याच ताकदीने एकमेकांसमोर ठाकली आहे. विविध विकासकामांची उद्घाटने करताना भाजपवर टीकास्त्र डागत अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. भाजपचे काही नेते-कार्यकर्ते त्यांची भेट घेत असल्याच्या अधूनमधून येणार्‍या वृत्ताने भाजपची चिंता निश्चितच वाढत असली तरी राज्यसभेचा विजय हे वातावरण निवळण्यास पुरेसे ठरला आहे.

कशी असेल दुहेरी रणनीती?
विधानपरिषद आणि लगेचच महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. भोसरीचे पहिले आमदार विलास लांडे, आझमभाई पानसरे यांच्यासारखे जुने-जाणते नेते राष्ट्रवादीकडे आहेत. अजित पवार यांचे व्हिजन साध्य करण्यासाठी या जुन्यांचा अनुभव आणि नव्यांचा उत्साह याची मोट बांधून रणनिती आखण्याचे आव्हान राष्ट्रवादीचे तरुण शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासमोर आहे. महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही, हे सध्या स्पष्ट नसल्याने राष्ट्रवादीला पुढे जाण्यासाठी हा देखील अडथळा आहे. भाजप एकटे लढणार असल्याने रणनिती स्पष्ट आहे. मात्र, महाआघाडी झाल्यास काय आणि नाही झाल्यास काय, असे दुहेरी नियोजन करुन राष्ट्रवादीला पुढे जावे लागणार आहे.

आ. जगतापांच्या स्वास्थ्यामुळे दिलासा

महापालिकेची मुदत संपल्यावर आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपकडून अंतर्गत तयारी सुरू असली तरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आजारपण बळावल्याने पक्षामध्ये धागधूग वाढली. जगताप यांच्या चिंतेने पक्षाचे नेते-कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. दरम्यान, त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने तणाव निवळला आणि पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने सक्रीय झाले. तिकडे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मोठ्या स्वरुपात बैलगाडा शर्यत घेवून लक्ष वेधून घेतले.

संरक्षण क्षेत्रातील जागेचा प्रश्न आणि इतर महत्वाच्या विषयांवर पाठपुरावा करीत त्यांनी पक्षाची खिंड लढविली. आ. जगताप खणखणीत बरे होऊन घरी परतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सवच साजरा केला. शहर आणि शहराच्या राजकारणाची खडान्खडा माहिती असणारे आमदार जगताप यांची आगामी निवडणुकीतील भूमिका महत्वाची असल्याने या समर्थकांबरोबरच पक्षाला मोठा दिलासा मिळाला. भाजपच्या बाजूने पारडे झुकल्याने भाजपमधून मोठे पक्षांतर होणार, या चर्चेला अर्धविराम मिळाला. याचदरम्यान, विधानपरिषदेसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी उमा खापरे यांचे नाव देऊन पिंपरी-चिंचवडकडे संपूर्ण ‘लक्ष’ असल्याचे भाजपने सूचित केले आहे.

Back to top button