

पुणे, पुढारी वृत्तसेवा: खडकवासला साखळी प्रकल्पातंर्गत असलेल्या सिंचन आणि बिगर सिंचन या विभागातून 2022-23 या आर्थिक वर्षात 226 कोटी 10 लाख 96 हजार एवढी पाणीपट्टी वसुल झाली आहे. मागील वर्षी 186 कोटींची पाणीपट्टी वसुल झाली होती. गतवर्षीपेक्षा यावर्षी सुमारे 65 कोटींनी अधिक पाणीपट्टीमधून महसूल मिळाला. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने वाढविलेल्या पाण्याच्या दरामुळे पाणीपट्टीच्या महसूलात वाढ झाली असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
खडकवासला पाटबंधारे विभागामार्फत पुणे महापालिका, जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, हवेली आणि बारामती तालुक्यातील काही भागांना सिंचन, तसेच पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. सिंचन आणि बिगरसिंचनास लागू असलेल्या पाण्याच्या दरानुसार पाणीपट्टीचा दर आकारला जातो. त्यानुसार पाणीपट्टी वसुल केली जाते. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सिंचन आणि बिगरसिंचनासाठी एकूण 186 कोटी 14 लाख रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, 226 कोटी 10 लाख 96 हजार एवढा महसूल पाणीपट्टीतून मिळाला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळास 513 कोटीचा महसूल पाणीपट्टीमधून मिळाला असून त्याच्या निम्मा महसूल केवळ एकट्या खडकवासला पाटबंधारे विभागातून मिळाला असल्याचे पाणीपट्टीच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्यामुळे दरवरर्षी खडकवासला पाटबंधारे विभागातील पाणीपट्टीचा महसूल वाढत आहे.
सन 2020-21 मध्ये 161 कोटी 79 लाख 27 हजार, सन 2021-22 मध्ये 161 कोटी 90 लाख 85 हजार एवढा महसूल पाणीपट्टीमधून मिळाला होता. मात्र यावर्षी झालेली वाढ निश्चितच जास्त आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पातंर्गत सिंचन आणि बिगर सिंचन या दोन प्रकारामधून पाणीपट्टी वसुल केली जाते. सिंचनापेक्षा बिगर सिंचनामधून पाणीपट्टीच्या माध्यमातून महसूल मिळण्याचे प्रमाण वाढत आहे.
– विजय पाटील, कार्यकारी अभियंता- खडकवासला साखळी प्रकल्प