पुणे, पुढारी वृत्तसेवा: रेल्वेने पार्सल पाठवायचेय, किती रुपये लागतील? उत्तर प्रदेशमधून पार्सल येतेय, कुठंपर्यंत आलेय, आणखी किती दिवस लागतील, पुणे रेल्वे स्थानकावर आले का, या संदर्भातील रेल्वे प्रवाशांच्या सर्व समस्या आता सुटणार आहेत. कारण रेल्वे प्रशासनाकडून आता पुणे रेल्वे स्थानकावर नुकताच पार्सल संबंधित समस्या सोडविण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष (हेल्प डेस्क) उभारण्यात आला आहे.
प्रवाशांना रेल्वेने येणार्या पार्सलविषयी सातत्याने समस्या भेडसावत होत्या. त्या पार्सलच्या चौकशीसाठी प्रवाशांना सारखेच रेल्वे स्थानकावर फेर्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा हेल्प डेस्क सुरू केला आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार असून, पार्सलसंदर्भात समस्या असल्यास, आता फक्त प्रवाशांना 9699746080 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा लागणार आहे.
पार्सल सुविधेसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकावर फोन केल्यास नागरिकांना त्यांच्या पार्सलची स्थिती, नवीन पार्सल कसे पाठवायचे, अशा गोष्टींची माहिती दिली जाणार आहे. या सुविधेचा रेल्वे प्रशासनाला आणि प्रवाशांना फायदा होणार आहे. पुणे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा सुरू केली आहे.
– डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग