पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राबविण्यात येणार्या अकरावीच्या प्रवेशासाठी 46 हजार अर्ज भरल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत अर्जाचा पहिला भाग आणि त्यानंतर दुसरा भाग विद्यार्थ्यांना भरता येणार आहे; परंतु अर्जांच्या आकडेवारीवरून यंदा अकरावी प्रवेशासाठी थंड प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. उर्वरित राज्यात प्रवेश प्रचलित पद्धतीने प्रवेश होणार आहेत. ऑनलाइन नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची संधी 30 मेपासून देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत 46 हजार 95 अर्ज भरण्यात आले आहे.
त्यापैकी 24 हजार 822 अर्ज लॉक करण्यात आले आहेत. तसेच 19 हजार 844 अर्ज व्हेरीफाईड करण्यात आले आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या समान गुणांच्या आधारे प्रवेश देताना जन्म दिनांक समान असल्यास विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव इंग्रजी घेऊन त्या वर्णाक्षरांनुसार क्रम ठरविण्यात येणार आहे.