तुमच्या घरात खूप अडचणी आहेत, तुमची साडेसाती दूर करतो, मला थोडी दक्षिणा द्या म्हणत केली महिलेची फसवणूक | पुढारी

तुमच्या घरात खूप अडचणी आहेत, तुमची साडेसाती दूर करतो, मला थोडी दक्षिणा द्या म्हणत केली महिलेची फसवणूक

मंचर, पुढारी वृत्तसेवा: तुमच्या घरात खूप अडचणी आहेत, तुमची साडेसाती दूर करतो, मला थोडी दक्षिणा द्या, असे म्हणत अंगात भगवे कपडे घातलेल्या दोन भामट्या बाबांनी 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेची फसवणूक करीत तिच्याजवळील 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना ढाकाळे तळेकरवाडी (ता. आंबेगाव) येथे घडली. याबाबत सुमन चंद्रकांत अंकुश (वय 70) यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्याचा पुन्हा डंका : बंदिस्त हवेतील कोरोना विषाणू नष्ट करणारे प्लगइन यंत्र तयार

याबाबत घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन अंकुश यांच्या घरी भगवे वस्त्र घातलेल्या दोन व्यक्ती आल्या. त्यातील एकाने फिर्यादी सुमन अंकुश यांना तुम्हाला खूप अडचणी आहेत, तुमची साडेसाती दूर करतो, परंतु मला थोडी दक्षिणा द्यावी लागेल असे सांगितले. त्यावेळेस फिर्यादी सुमन अंकुश यांनी त्यांना दहा रुपये दिले. त्यातील एकाने फिर्यादिस दोन लिंबे, शंकराचा नंदी, अंगारा दिला. त्यानंतर फिर्यादीने पुन्हा त्यांना 151 रुपये दक्षिणा दिली. त्यावर त्या व्यक्तीने आजी मला दक्षिणा नको, मी तुमचे मन पाहत होतो असे म्हणून त्याने फिर्यादीच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काढून घेऊन दोन लिंबे, शंकराचा नंदी, अंगारा असलेल्या पिवळ्या धातूच्या कमंडलूमध्ये ठेवून हातचलाखी करून मंगळसूत्र घेऊन गेले. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने घोडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक वागज करीत आहेत.

आंबेगाव तालुक्यात ज्येष्ठ नागरिक महिलांना फसविण्याचे प्रकार वाढू लागले असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तीला घरात घेऊ नये. गावात व परिसरात संशयित व अनोळखी व्यक्ती निदर्शनास आल्यास त्याचा व त्याच्या गाडीचा फोटो काढून ठेवावा. हे सर्व करत असताना अनोळखी व संशयित व्यक्तीस कुठल्याही कारणावरून मारहाण न करता पोलिस पाटील व पोलिसांना कळवावे.
– जीवन माने, सहायक पोलिस निरीक्षक, घोडेगाव

Back to top button