मुलाला कॅनडात नोकरी लावण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल | पुढारी

मुलाला कॅनडात नोकरी लावण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मुलाला कॅनडात नोकरी लावण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला 36 लाख 53 हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत चार अज्ञात मोबाईलधारकांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फसवणूक व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी येथील एका 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2 जून रोजी दुपारी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोकरी डॉट कॉमवर मुलासाठी नोकरी शोधत होते. या दरम्यान त्यांनी मुलाची ऑनलाइन माहिती भरली. त्यानंतर फिर्यादीला त्यांच्या मोबाईलवर फोन आला. मुलाला कॅनडात नोकरी लावण्याचे त्यांना आमिष दाखविण्यात आले. या आमिषाला बळी पडून अज्ञात मोबाईलधारकांनी सांगितल्यानुसार वेळोवेळी फिर्यादी यांनी तब्बल 36 लाख 53 हजार पाठविले.

पैसे पाठविल्यानंतर मोबाईलधारक आरोपींकडून टाळाटाळ होऊ लागल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद दिली.

तक्रारदारांच्या मुलाला लग्नाचे आमिष दाखविल्यानंतर त्यांनी वेळावेळी ऑनलाइन पैसे भरल्याचा प्रकार या प्रकरणात घडला. जेव्हा त्यांनी मोबाईलधारक अज्ञात आरोपीकडे व्हिसाची मागणी केली तेव्हा आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे येऊ लागली. त्यांच्याकडून आम्ही थेट संबंधित अ‍ॅम्बेसेडरकडे पैसे भरत असल्याचे मोबाईल धारकारकांनी सांगितले. आरोपींची भूमिका संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर ही तक्रार देण्यात आली.

अनिता हिवरकर, गुन्हे निरीक्षक, बिबवेवाडी पोलिस ठाणे.

Back to top button