तारण ठेवलेली जमीन परस्पर विकली; निघोटवाडी पतसंस्थेची तीन लाखांची फसवणूक, चौघांवर गुन्हा | पुढारी

तारण ठेवलेली जमीन परस्पर विकली; निघोटवाडी पतसंस्थेची तीन लाखांची फसवणूक, चौघांवर गुन्हा

मंचर, पुढारी वृत्तसेवा: थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील साईनाथ बाळासाहेब विश्वासराव यांनी आणि इतर तिघांनी मंचर येथील निघोटवाडी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडे कर्जापोटी तारण ठेवलेली शेतजमीन परस्पर विकली. पतसंस्थेची 2 लाख 99 हजार 881 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पतसंस्थेचे व्यवस्थापक नरेंद्र वाघ यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दि. 16 मार्च 2015 रोजी साईनाथ बाळासाहेब विश्वासराव (रा. थोरांदळे, ता. आंबेगाव) यांनी निघोटवाडी पतसंस्थेकडून त्यांचे वडील बाळासाहेब ऊर्फ बाळू नाना विश्वासराव (रा. थोरांदळे) यांच्या नावे असलेली शेतजमीन गट क्रमांक 329 क्षेत्र 0.67 आर व ग्रामपंचायत थोरांदळे येथील घर पतसंस्थेस गहाणखत करून दिले. यापोटी पतसंस्थेकडून दोन लाखांचे कर्ज घेतले. यासाठी विकास पांडुरंग कोकणे, पांडुरंग किसन मिंडे (दोघेही रा. थोरांदळे) त्यांना जामीनदार होते.

आईला भेटायला आला आणि जाळ्यात सापडला

निघोटवाडी पतसंस्थेकडून नजरचुकीने तारण मिळकतींवर बोजा चढविण्याचे राहून गेले. कर्जदार साईनाथ विश्वासराव यांनी 27 मार्च 2018 पर्यंत एकूण 39 हजार 771 रुपये भरले. कर्ज रक्कम आणि व्याज थकल्याने दि. 5 फेब्रुवारी 2018 रोजी पतसंस्थेने संबंधितांना नोटीस दिली. दि 22 फेब—ुवारी 2018 रोजी संस्थेने जप्ती नोटीस पाठवली. त्यावेळी कर्जदार यांनी मार्च अखेरपर्यंत थकीत रकमेचा भरणा करून नियमित हप्ते भरेल असे सांगितले. दि. 18 एप्रिल 2019 रोजी साईनाथ विश्वासराव व बाळासाहेब विश्वासराव यांनी पतसंस्थेकडे तारण ठेवलेली जमीन हनुमंत व्यंकट काळे (रा. मिरा भाईदर, ठाणे) यांना विकल्याचे पतसंस्थेच्या लक्षात आले. पतसंस्थेने संबंधितांना वारंवार कर्जफेड करण्यास सांगितले. परंतु त्यांनी कर्ज भरणा न केल्याने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तपास पोलिस जवान सुदाम घोडे करीत आहेत.

Back to top button