विमानतळावर पार्किंग? नो टेन्शन; मल्टिलेव्हल पार्किंगचे काम अंतिम टप्प्यात


मल्टिलेव्हल पार्किंगचे संकल्पचित्र.
मल्टिलेव्हल पार्किंगचे संकल्पचित्र.

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे विमानतळावर गेल्यावर सर्वप्रथम भेडसावणारी पार्किंगची समस्या आता लवकरच संपणार आहे. कारण विमानतळ परिसरात उभारण्यात येणारे 'मल्टिलेव्हल पार्किंग'चे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या सप्टेंबर महिन्यात ते प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. पुण्याची लोकसंख्या जसजशी वाढतेय, तसतशी गेल्या अनेक वर्षांपासून पुणे विमानतळावर प्रवाशांना सातत्याने पार्किंगची समस्या भेडसावत आहे. त्याकरिता विमानतळ प्रशासनाने व्यावसायिक दृष्टिकोनातून एक भव्य असे पार्किंग उभारण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार हे पार्किंग आता आकार घेत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे याचा फायदा विमानतळावरील प्रवाशांना
होणार आहे.

पार्किंगचे दर शासन ठरविणार

विमानतळ प्रशासनाकडून उभारण्यात येणार्‍या पार्किंगचे काम आता पूर्ण होत आहे. या चार मजली असलेल्या हायटेक पार्किंगमध्ये ओला, उबेर गाड्यांचेही पार्किंग असणार आहे. थेट येथूनच प्रवाशांना टॅक्सी बुक करता येईल. त्यासोबतच या पार्किंगमध्ये तासाच्या दरानुसार प्रवाशांना आपल्या दुचाकी, चारचाकी येथे पार्क करता येतील. त्याचे दर शासनाने ठरविलेले असतील, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

ऑनलाइनसुद्धा बुक करता येणार पार्किंग

चित्रपटाच्या तिकिटाप्रमाणेच प्रवाशांना मोबाईलवरूनसुद्धा पार्किंग बुक करता येणार आहे. त्याकरिता निश्चित करण्यात आलेले शुल्क प्रवाशांना ऑनलाईन गुगल पे, फोन पे, पेटीएमद्वारेसुद्धा देता येणार आहे.

पार्किंगचा व्यावसायिक वापर

चार मजली असलेल्या 'मल्टिलेव्हल पार्किंग'चा वापर विमानतळ प्रशासन व्यावसायिक तत्त्वावरदेखील करणार आहे. प्रत्येक मजल्यावरील पार्किंगसोबत येथे फूड स्टॉल आणि काही खासगी कार्यालयेसुद्धा असणार आहेत. त्यामुळे विमानतळ प्रशासनाला या पार्किंगमधून मोठा महसूल मिळणार आहे.

फूट ओव्हर ब्रीजचे काम अंतिम टप्प्यात

विमानतळ येथे उभारण्यात येणार्‍या पार्किंगमध्ये थेट वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक फूट ओव्हर ब्रीज उभारण्यात येत आहे. त्याचेसुद्धा काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलाचादेखील वापर प्रवाशांना सप्टेंबरमध्येच करता येणार आहे.

प्रवाशांना विमानतळावर येणारी पार्किंगची अडचण सोडविण्यासाठी आम्ही मल्टिलेव्हल पार्किंग उभारण्याचे काम हाती घेतले होते. ते आता पूर्ण होत आले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात प्रवाशांना या पार्किंग सुविधेचा फायदा घेता येईल.

                                – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news