कांद्याच्या भावात पुन्हा 200 रुपयांची घसरण; आखाती देशांतील स्थितीने शेतकरी अडचणीत | पुढारी

कांद्याच्या भावात पुन्हा 200 रुपयांची घसरण; आखाती देशांतील स्थितीने शेतकरी अडचणीत

चाकण : पुढारी वृत्तसेवा

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये 8 जून रोजी 3 हजार पिशवी कांद्याची आवक झाली. कांद्याला 1 हजार ते 1 हजार 400 रुपये एवढा प्रतिक्विंटलला भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. 1 हजार 600 रुपयांपर्यंत पोहचलेले कांद्याचे कमाल भाव आवक कमी असल्याने आणखी वाढण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात 200 रुपयांनी गडगडले.

श्रीलंकेतील अस्थिर परिस्थिती, आखाती देशांतील नव्याने उद्भवलेली स्थिती, सौदी अरेबिया, कतार, कुवेतसह इतर आखाती देशांमध्ये भारतीय वस्तूंवर होत असलेला विपरीत परिणाम, याचा फटका कांद्याच्या निर्यातीला बसला आहे, असे निर्यातदार कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. आखाती देश आणि श्रीलंका येथेच मोठ्या प्रमाणावर कांद्याची निर्यात होते.

मात्र, त्याच देशातील स्थितीने कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाल्याचे कांद्याच्या बड्या निर्यातदार कंपन्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, चाकण मार्केटमध्ये बटाट्याचे भाव टिकून आहेत. 8 जून रोजी चाकणला 4 हजार पिशवी बटाट्याची आवक होऊन 1500 ते 2 हजार रुपये एवढा बटाट्यास प्रतिक्विंटलला भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा 

बचतगटांनी उत्पादित वस्तूंचे ऑनलाईन मार्केटिंग करावे

फारूक अमोनातोव्हला विजेतेपदाचा मान

गौण खनिजाची अवैध वाहतूक येणार अंगलट; वाहनांना जीपीएस जुलैपासून बंधनकारक

Back to top button