आंबिल ओढ्यावरील पाचच कल्व्हर्ट पूर्ण | पुढारी

आंबिल ओढ्यावरील पाचच कल्व्हर्ट पूर्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आंबिल ओढ्यावरील दहापैकी केवळ पाचच कल्व्हर्टचे काम पालिकेने पूर्ण केले आहे, तसेच ओढ्याच्या सीमाभिंती आणि राडारोडा काढण्याची कामेही अर्धवटच असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्विनी कदम यांनी केला आहे.

पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेल्या व उर्वरित कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी आंबिल ओढ्याची पाहणी केली. या वेळी कदम यांनी अपूर्ण आणि न झालेल्या कामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला सप्टेंबर 2019 मध्ये पूर आला होता. या पुरात सात जणांचा बळी गेला.

अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिकेने नाला रुंदीकरण, कल्व्हर्ट बांधणे, सीमाभिंती बांधणे, खोलीकरण, असा निर्णय घेतला होता. परंतु, या कामापैकी अनेक कामे अपूर्ण आहेत, असे कदम यांनी निदर्शनास आणून दिले. मित्रमंडळ येथे जलवाहिनी हलविली न गेल्याने तेथील पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर खेमनार यांनी तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

Back to top button