पुणे-कोल्हापूर मार्गावर धावली विद्युतीकरणावरील पहिली रेल्वे | पुढारी

पुणे-कोल्हापूर मार्गावर धावली विद्युतीकरणावरील पहिली रेल्वे

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे- कोल्हापूर रेल्वे मार्गावर प्रथमच कोयना एक्स्प्रेस रेल्वेगाडीने संपूर्ण प्रवास विद्युतीकरणावर केला. रेल्वेकडून या मार्गावर सिंगल लाइनचे नुकतेच विद्युतीकरण झाल्यामुळे पहिल्यांदाच ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून कोल्हापूरसाठी प्रायोगिक तत्त्वावर सोडण्यात आली होती.

रेल्वे प्रशासनाकडून मिरज- कोल्हापूर मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर येथून विद्युतीकरणावर रेल्वेगाडी चालविण्याचे रेल्वेचे नियोजन होते. त्यापूर्वी रेल्वेने या मार्गाची सेफ्टी अधिकार्‍यांच्या मदतीने पहाणी केली. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर कोयना एक्स्प्रेसचा मुंबई ते कोल्हापूरचा संपूर्ण प्रवास पहिल्यांदाच विद्युतीकरणावर झाला आहे.

सेंट्रल इलेक्ट्रिफिकेशन ऑर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार, प्रति 100 कि.मी. रेल्वे विद्युतीकरणाने वर्षाला 4 दशलक्ष लिटर डिझेलची बचत होते, ज्यामुळे 2500 कोटी परदेशी-पैशांची देवाण-घेवाण वाचवता येते. यामुळे देशाची आत्मनिर्भरता वाढेल. या विद्युतीकरणातून प्रति 100 कि.मी. प्रतिवर्ष सुमारे 10560 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होणार आहे. रेल्वे विद्युतीकरणाचा मोठा फायदा म्हणजे प्रदूषणमुक्त वातावरण हा आहे.

वेळेत आणि इंधन खर्चात बचत
पुणे-कोल्हापूर मार्गावर विद्युतीकरण झाले नव्हते तेव्हा कोयना एक्स्प्रेस मुंबईहून निघाल्यावर पुणे रेल्वेस्थानकावर विद्युतीकरणावर धावायची. पुण्यात आल्यावर कोयना एक्स्प्रेसचे इंजिन बदलले जायचे आणि तिला डिझेलवरील इंजिन जोडले जायचे. या प्रक्रियेत प्रवाशांना नाहक त्रास होत असे. पुणे स्थानकावर इंजिन बदलेपर्यंत थांबावे लागत असे. त्यासोबतच रेल्वे प्रशासनाचा डिझेलवरील खर्चदेखील वाढत होता. आता मात्र प्रवाशांच्या वेळेत आणि रेल्वेच्या इंधन खर्चात मोठी बचत होणार आहे.

Back to top button