मोदींच्या धोरणांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली; माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन | पुढारी

मोदींच्या धोरणांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली; माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांचे सशक्तीकरण करून त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी महत्वपूर्ण 10 योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या योजनांमुळे देशातील सर्व सामान्य जनता जगत असून, त्यांना आत्मसन्मान प्राप्त झाला आहे. केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबविलेल्या राष्ट्रीय व परराष्ट्रीय प्रभावी धोरणांमुळे जगात आपल्या देशाची प्रतिष्ठा व सन्मान वाढला आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

लोणावळा येथे भाजपच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बुथ सशक्तीकरण कार्यक्रमप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, महिला प्रदेशच्या नेत्या उमा खापरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, ज्येष्ठ नेते अविनाश बवरे, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक देविदास कडू, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, संदीप काकडे आदी उपस्थित होते.

निमगाव केतकी: कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत इंदापूरमधील २३ वर्षीय युवक ठार

यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी काही मूलभूत सोयीसुविधांसह प्रभावी योजना अंमलात आणल्या. यामध्ये प्रत्येकाला घर, वीज, पाणी, गॅस, विमा, आरोग्य, रस्ते इत्यादी मूलभूत सोयीसुविधांसह जनधन, आयुष्यमान भारत व सन्माननिधी या योजनांसह इतर योजनांचा समावेश आहे . या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिक आता आत्मसन्मानाने जगण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्यांचे जीवनमान उंचावले आहे. यामुळे देशातील जनता समाधान व्यक्त करत आहे.

राजीव गांधी म्हणायचे की मी शंभर रुपये पाठवले

मात्र त्यांनी पाठविलेल्या शंभर रुपयांपैकी केवळ 15 रुपयेच नागरिकांच्या खात्यात जमा व्हायचे किंवा हातात मिळायचे. ही त्यावेळची विदारक परिस्थिती होती. आता मोदीजी शंभर रुपये पाठवतात ते सर्व शंभर रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा होत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये विविध योजनांचे 21 लाख कोटी रुपये नागरिकांच्या खात्यावर जमा झाले आहेत. हे सर्वात मोठे केंद्र सरकारचे काम आहे. मोदीजी व केंद्र सरकारच्या प्रभावी कामगिरीमुळे सध्या जगामध्ये देशाची प्रतिष्ठा व सन्मान वाढला आहे.

यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले की, बूथ सशक्तीकरण ही आमच्या पक्षाची मोहीम असून, राज्यात ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो, त्या ठिकाणची कारणे शोधून, त्यावर काय उपाय करता येईल यासाठी आम्ही काही नियोजनबद्ध कार्यक्रम व योजना हाती घेतल्या आहेत. राज्य सभेची सहावी जागा भाजपच जिंकणार असल्याचा विश्वास जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

 मुलाला जीवे मारण्याची धमकी; महिलेला झुडपात ओढून नेत बलात्कार, आरोपीला अटक

‘राज्यातील आघाडी अनैसर्गिक’

राज्यांमधली सध्याची आघाडी अनैसर्गिक आहे. निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले आता सत्तेसाठी एकत्र बसले आहेत. शिवसेना तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून निवडून आली. आणि त्यांनी सत्तेसाठी मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली. या आघाडीचा एकच कार्यक्रम आहे. वसुली करणे आणि सर्व केसेस संपविणे व दाबणे. हेच दोनच कार्यक्रम त्यांचे किमान एक कलमी संयुक्त कार्यक्रम असल्याचा टोला जावडेकर यांनी लगावला.

Back to top button