

पुणे : पुढारी वृत्तसेवा
शिक्षण क्षेत्रात खासगी शैक्षणिक संस्थांमुळे वाढलेल्या स्पर्धेत शासकीय शाळेतील विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी समाज कल्याण विभाग शासकीय निवासी शाळा सुरू करणार आहे. या शाळा खासगी शाळांच्या धर्तीवर असतील, असा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
समाज कल्याण विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील सहायक आयुक्त व संबंधित शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नामांकित शाळेला भेट देऊन तेथील माहिती घ्यावी, खासगी संस्थेत उपलब्ध असलेली साधनसामग्री, क्रीडांगणे, क्रीडा साहित्य व इतर सर्व बाबींची माहिती घ्यावी, त्या अनुषंगाने तत्काळ प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा आणि चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्यापूर्वी नियोजन करावे.
अशा सूचना समाज कल्याण आयुक्तांनी दिल्या आहेत. खासगी शाळांमधील क्रीडांगणांप्रमाणेच शासकीय शाळांमध्येही क्रीडांगणे विकसित करावीत, जेणेकरून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. त्याचबरोबर सीबीएससी अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भातील नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करा
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 13 जूनपासून होत आहे. शाळेत प्रवेश घेताना बालकांना उत्साहवर्धक व आनंदी वातावरण दिसेल, यासाठी विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करा, असे आदेश समाज कल्याण आयुक्त नारनवरे यांनी दिले आहेत. शाळा सुरू होण्याच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभात फेरीचे आयोजन करावे, विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत करावे, पुस्तके, स्टेशनरी वितरण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आदेशात म्हटले आहे.
राज्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी 100 शासकीय निवासी शाळा कार्यरत असून विभागाचे मंत्री धनंजय मुंडे व सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व शाळा येणार्या काळात नामांकित करण्याचा संकल्प विभागाने केला आहे.
– डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, पुणे