ट्रक चालकांना डोळ्यांचे विकार; रस्ते, परिवहन मंत्रालयाच्या सर्व्हेतून उघड झाले वास्तव

ट्रक चालकांना डोळ्यांचे विकार; रस्ते, परिवहन मंत्रालयाच्या सर्व्हेतून उघड झाले वास्तव
Published on
Updated on

शशांक तांबे

पिंपरी: अवजड वाहनांच्या वाढत्या अपघातांमागे चालकांचे नेत्रविकार अन् नंबर हे एक कारण असल्याचे रस्ते, परिवहन मंत्रालयाच्या सर्व्हेमधून निदर्शनास आले आहे. चालकांची नेत्रतपासणी करण्याचे काम विविध एनजीओमार्फत होत असून, तपासणीमध्ये 95 टक्के चालकांना डोळ्यांचे विकार असल्याचे वास्तव समोर आले आहे.

रोड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीच्या माध्यमातून गेल्या वर्षी 2021 मध्ये अवजड वाहतूक करणार्‍या वाहतूकदारांच्या दृष्टीबाबत सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये चालकांना सातही दिवस गाडी चालवावी लागत असल्याने डोळ्यांवर ताण येऊन दृष्टीबाबत अडचणी असल्याचे लक्षात आल्याने रोड ट्रान्स्पोर्टस ऑथॉरिटी आणि काही एनजीओच्या माध्यमातून अवजड आणि वाहतूक दरांची नेत्र तपासणी सुरू केली आहे. यामध्ये बहुतांश चालकांना चष्मा असल्याचे समोर आले आहे. तर अनेकांना डोळ्यात अ‍ॅलर्जी असून डोळ्यात विकार जडल्याचे वास्तव समोर आले आहे.

पिंपरी चिंचवडमधील आयडियल इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आणि रोड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीतर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत अवजड वाहतूक वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात येत आहे. चिंचवड गाव, ट्रान्स्पोर्ट नगरी, लॉजिस्टिक पार्क, सोमाटणे फाटा याठिकाणी नेत्र तपासणी करण्यात येत आहे. मार्चपासून सुरूवात झालेल्या या उपक्रमात अनेक वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 75 ते 80 टक्के वाहन चालकांना डोळ्यांचा विकार व नंबर असल्याचे आढळून आले आहे.

नेत्र तपासणी वेळी वाहन चालक डोळे तपासायला आल्यावर समोर असलेला चार्ट बघून त्यावरील चिन्हे सांगून मुझे जाने दो , मेरा टाइम जा राहा है, मेरी आखों को कुछ नाही हुवा है, मुझे देरी हो राही है, मुझे जाना है, अशा प्रतिक्रिया दिल्या. वेळेत पुढील ठिकाण गाठायचे असल्याने वाहन चालकांना वेळेचे बंधन असते. अनेकांनी विविध कारणे देत डोळे तपासणी टाळली.

परवाना दिल्यावर पुन्हा नेत्रतपासणी नाही

अवजड वाहतुकीसाठी (हेव्ही व्हेईकल) परवाना काढताना मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागते. त्यानंतर परवाना मिळतो. परंतु, परवाना मिळाल्यानंतर कोणताही त्रास सुरू झाला, दृष्टीमध्ये काही अडचण आली तरी चालक गाडी चालवत राहतो. आरटीओकडून वारंवार तपासण्या करणारी कोणतीच यंत्रणा नाही. त्यामुळे एकदा परवाना मिळाल्यावर काही त्रास झाला तरी चालक बिनधास्त गाडी चालवत राहतात. चालक आठवड्यातील सातही दिवस गाडी चालवत असतात. त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो पर्यायाने दृष्टीचे विकार जडतात. या उपक्रमात प्रवासी वाहतूक करणार्‍या गाड्यांना देखील समाविष्ट केले पाहिजे, वाहतूकदारांची सातत्याने तपासणी करण्याची गरज आहे.
-रमाकांत पोतदार, प्रकल्प समन्वयक

सर्वच चालकांना डोळ्यांचा नंबर आढळून आला असून त्यांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. बहुतांश चालकांना लांबचा नंबर आढळून आला आहे.
– मल्हारी काळे, नेत्रतपासणी कर्मचारी

या उपक्रमामुळे मला माझ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, हे समजले. मला छोट्या स्वरूपाचा नंबर आहे, हे मला समजले.
– ज्ञानेश्वर शिरोडकर, ट्रक चालक

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news