पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुण्यातील एक 14 वर्षांची मुलगी ब्रेनडेड झाल्याने तिचे हृदय तेवढ्याच वयाच्या मुलाला दान करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. ही यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सैन्य दलाच्या रुग्णालयात पार पडली.
चौदा वर्षे फिरोजला (नाव बदलले आहे) थकवा आणि दम लागत असल्याने दोन वर्षांपूर्वी त्याला सैन्य दलाच्या (एआयसीटीएस) रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्या वेळी त्याचे हृदय निकामी झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून फिरोज हृदयाच्या प्रतीक्षेत होता. फिरोजचे वय कमी, त्यातच त्याच्या वयाचा, रक्तगटाचा, वजनाचा अवयवदाता मिळणे कठीण होते.
त्यामुळे त्याला हृदय मिळेल की नाही, ही चिंता होती. अशातच सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रस्ता अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेली एक 14 वर्षीय मुलगी उपचार घेत असताना तिला डॉक्टरांनी ब—ेनडेड जाहीर केले. विशेष म्हणजे, तिचे हृदय फिरोजला वैद्यकीयदृष्ट्या जुळून आले. त्यामुळे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.