वाल्हे : पुढारी वृत्तसेवा
राखनजीक कापडदरा (ता. पुरंदर) येथील श्री भैरवनाथ मंदिर मोडकळीस आल्याने ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. गावात भव्य आकर्षक मंदिर बांधल्याने वैभवात भर पडली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी, हनुमान मूर्ती व कलशाची भव्य-दिव्य मिरवणूक, निरा नदीवर शाहीस्नान घातल्यानंतर पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत आकर्षक सजविलेल्या रथामधून गावांतर्गत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान दिवसभर होमहवन, प्रवचन, मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी गावातील ग्रामस्थांनी घरोघरी गुढी व मिरवणूक मार्गावर दुतर्फा रंगबेरंगी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. यामध्ये डोक्यावर तुळशी वृंदावन, ज्ञानेश्वरी घेऊन महिला मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झाल्या होत्या.
बुधवारी (दि. 1) सकाळी होम, मंदिराची वास्तुशांती, गणेश पूजन, मूर्तिप्रतिष्ठापना, दुपारी आळंदी येथील महादेव महाराज इंगोले यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीचा जयघोष करीत प्रतिष्ठापना व कलशारोहणाचा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी बारामती येथील शिवाजी महाराज शेळके यांच्या भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माहेरवाशीण सुवासिनींची महिला ग्रामस्थांच्या वतीने ओटी भरून, साडी-चोळी भेट दिली. आरतीनंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे संयोजन कापडदरा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.