पुण्यात भाजपची ‘सेफ’ अस्वस्थता | पुढारी

पुण्यात भाजपची ‘सेफ’ अस्वस्थता

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : भाजपचे स्थानिक नेते सेफ गेम खेळणार की मातब्बर विरोधकांच्या पाडावासाठी थेट त्यांच्या मैदानात उतरून समोरासमोर आव्हान देणार याची चर्चा आता रंगली आहे. स्थानिक नेते परंपरागत मतदारांच्या जिवावर निवडून येणार आणि विरोधकांच्या गुहेत लढण्यासाठी कार्यकर्त्यांना उभे करणार, याबाबत पक्षश्रेष्ठींनाही निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून विचारणा होण्याची शक्यता वाढली आहे.

कार्यकर्त्यांच्या या भावनेला, अस्वस्थतेला मोकळी वाट करून दिली, ती खासदार गिरीश बापट यांनी. तीदेखील केंद्रीय मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसमोर. बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात. साहजिकच कार्यकर्त्यांनीही त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. पंधरवड्यापूर्वी हा कार्यक्रम झाला. बापट हा मुद्दा पुनःपुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून मांडू लागल्याने यामागे राजकीय खेळी असल्याची चर्चा रंगली आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी थेट अमेठीत जाऊन लढल्या. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधी यांना त्यांनी पराभूत केले. त्याचा आधार घेत बापट म्हणाले की, त्या पक्ष सांगेल तेथे जाऊन निवडणूक लढवितात, जिंकतात. पुण्यात भाजपला 20 ते 25 जागा वाढवायच्या आहेत. पक्षात अनेक दिग्गज आहेत. पक्षाच्या विजयासाठी पक्ष सांगेल तेथे लढून, निवडून येण्याची तयारी त्यांनी दाखविली पाहिजे.

तरीदेखील अनेक जण आपले खुराडे सोडायला तयार नाहीत. त्यांचा रोख कोणाकडे असेल याचीच उलटसुलट चर्चा कार्यकत्र्यांत सुरू झाली. त्यातच काही माननीयांनी स्वतःसाठी सेफ प्रभागाची रचना करून घेतल्यासंदर्भातही उलटसुलट बातम्या पसरू लागल्याने, कार्यकर्त्यांतील अस्वस्थता वाढली आहे.

महापालिकेतील सत्तेत गेल्या पाच वर्षांत भाजपमधील नेतृत्वाची नवी फळी उभारली. महापालिकेतील महत्त्वाच्या चार पदांवर पूर्वीपासून भाजपमध्ये असलेल्या नऊ जणांनाच संधी मिळाली. पालकमंत्री बापटांना महापालिकेच्या राजकारणात फारसा वाव मिळाला नाही. मात्र, नऊपैकी चौघे जण त्यांच्या कसबा पेठ मतदारसंघातील होते. उरलेल्या पाच जणांत एक मंत्र्याचा, तर दुसरा आमदाराचा भाऊ होता.

आमदार पदाच्या शर्यतीतील मुरलीधर मोहोळ यांना महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद मिळाले. दोघे आता आमदारही झाले.
या पदाधिकार्‍यांनी विरोधकांशी दोन हात करावेत, असा बापट यांचा रोख असावा. त्यांचे प्रभाग पाहिल्यास, चौघांना त्यांच्याच प्रभागात लढावे लागेल. काहींपुढे तेथेही आव्हान आहे. त्यामुळे तिघेच उरतात. त्यांनी विरोधकांचे तगडे आव्हान स्वीकारावे, असे बापट यांचे म्हणणे असल्याची चर्चा कार्यकत्र्यांत आहे.

त्यात समावेश होतो तो मोहोळ, धीरज घाटे आणि हेमंत रासने यांचा. मोहोळ हे प्रभाग 33 मध्ये, तर घाटे व रासने हे इच्छुक आहेत शनिवार पेठ – नवी पेठ या सेफ प्रभागांतून. कार्यकर्त्यांच्या चर्चेचा कानोसा घेतला, तर समजून येते की मोहोळ यांनी लगतच्या कोथरूडमध्ये शिवसेनेविरुद्ध लढावे, तर रासने यांनी कसबा पेठेत आणि घाटे यांनी त्यांच्या शिवदर्शन – पद्मावतीमध्ये लढून काँग्रेसच्या आव्हानाला तोंड द्यावे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ते तिघेही निवडून येतील व नगरसेवकांची संख्या वाढू शकेल. प्रभाग 16 या सेफ प्रभागातही पक्षांतर्गत आयात उमेदवारांची चर्चा रंगू लागली आहे.

विरोधी गटाचीही भूमिका

दुसर्‍या विरोधी गटातील कार्यकर्तेही त्यांची बाजू हिरीरीने मांडतात. त्यांच्यातील चर्चेनुसार, बापटांनीही त्यांच्या सुनेसाठी सेफ प्रभागाचा आग्रह धरू नये. तेही लढवय्ये आहेत. सध्या भाजपमध्ये आमदार-खासदार यांची मुले-मुली, नातलग निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मग सेफ प्रभाग या लोकांच्या पदरात पडल्यास, कार्यकर्त्यांनीच लढाई करायची का, याची कुजबुज कार्यकर्त्यांत रंगली आहे.

 

Back to top button