आरटीओ कार्यालयात जाण्याचे हेलपाटे वाचणार; ऐंशी सेवा झाल्या ऑनलाइन, वाहनचालकांना दिलासा | पुढारी

आरटीओ कार्यालयात जाण्याचे हेलपाटे वाचणार; ऐंशी सेवा झाल्या ऑनलाइन, वाहनचालकांना दिलासा

बारामती : पुढारी वृत्तसेवा

आरटीओशी संबंधित कामांसाठी वाहनचालकांना आता कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. परिवहन विभागामार्फत सहा सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. सध्या आरटीओशी संबंधित 115 सेवांपैकी 80 सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्यात येतात.
परिवहन प्राधिकरण कार्यालयात वाहन लायसन्स नूतनीकरण, पत्ता बदल आणि दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी

ना-हरकत प्रमाणपत्र या सहा सेवा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील आरटीओ विभागामार्फत 115 अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र, परवाना संबंधित सेवा देण्यात येत असून, केंद्र शासनाच्या सूचनांनुसार 80 सेवा ऑनलाइन आहेत. नव्याने सहा सेवा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येत आहेत, याचा लाभ लाखो वाहनचालकांना होणार आहे.

पारदर्शक सेवा नागरिकांना मिळावी यासाठी या सेवा आधारकार्डसोबत जोडण्यात आल्या आहेत. अर्जदार अर्ज, पेमेंट व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू शकतो.

सर्व प्रक्रिया ऑनलाइन

अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्मतारीख व मोबाईल क्रमांक याची खातरजमा झाल्यामुळे आता पुढील 6 अर्जांकरिता कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. तसेच नवीन लायसन्स / नोंदणी प्रमाणपत्र अर्जदारास पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. दुय्यम नोंदणी प्रमाणपत्राकरिता वर्षभरात एक लाख अर्ज प्राप्त होतात.

ना-हरकत प्रमाणपत्राकरिता वर्षभरात 30 हजार, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलण्यासाठी 20 हजार, (लायसन्स) अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण प्रमाणपत्राकरिता दोन लाख अर्ज, अनुज्ञप्तीवरील (लायसन्स) पत्ता बदलकरिता दोन लाखाहून अधिक अर्ज प्राप्त होतात. अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणाकरिता 14 लाख अर्ज प्राप्त होतात. आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.

हेही वाचा

नांदेडजवळ अपघातात एकाच कुटुंबातील 3 ठार

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवेंचा राजीनामा

उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सहकार विभाग दचकतोय; बाजार समितीवर सहनिबंधक दर्जाचाही अधिकारी नाही

Back to top button