पुणे- मुंबई महामार्गावर प्रवाशांना लुटणार्‍या जोडगोळीला अटक; हिंजवडी पोलिसांची कामगिरी | पुढारी

पुणे- मुंबई महामार्गावर प्रवाशांना लुटणार्‍या जोडगोळीला अटक; हिंजवडी पोलिसांची कामगिरी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या जोडगोळीला हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली. किरण भरत साळुंके (23), समाधान आण्णा शेटे (21, दोघे रा. मुपो नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलिस निरक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी प्रवासी सुमेध नारायण गुरव (32, रा. मोहनवाडी, खोपोली, ता. खालापुर जि. रायगड) हे खोपोली येथे जाण्यासाठी शनी मंदिर, वाकड येथे थांबले होते. त्यावेळी आरोपींनी एका पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये गुरव यांना बसवले. दरम्यान, आरोपीने कॉल करण्यासाठी त्यांच्याकडून मोबाईल घेतला. त्यातील सिमकार्ड काढून ते गुरव यांना देवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गुरव यांना द्रुतगतीवर शिरगाव येथे सोडले.

महसूल लाखोंचा, तरीही सुविधांचा अभाव; पिंपरीमधील दस्त नोंदणी कार्यालयातील चित्र

अशाच प्रकारची आणखी एक घटना 30 मे रोजी या परिसरात घडली. दत्तात्रय काशिनाथ टिचगे (32, रा. मोशी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. टिचगे त्यांच्या ठाणे येथील बहिणीकडे जात होते. दरम्यान, ते वाकड ब्रिज येथून एका लाल रंगाच्या काळ्या काचा असलेल्या कारमध्ये बसले. कार वाकड ब्रिजवरून मुंबईच्या दिशेने जात असताना कार मधील दोघांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील एक हजार रुपये रोख रक्कम आणि सहा हजारांचा मोबाईल फोन, एटीएम कार्ड काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना गहुंजे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला कारमधून खाली उतरवून मुंबईच्या दिशेने पलायन केले होते.

या गुन्ह्यांचा तपास करत असताना हिंजवडी पोलिसांनी उर्से टोल नाका, सोमाटणे टोल नाका, खालापुर टोल नाका, तसेच पुणे सातारा रोडवरील टोल नाक्यावरील 80 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. पोलीस नाईक अरुण नरळे यांना संशयित आरोपींबाबत महिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी किरण आणि समाधान यांना हिंजवडी पोलीस ठाण्यात आणले आणि चौकशी केली. त्यात दोघांनी मिळून हे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली.

Video: बेधडक दादा ! “थोडं बारीक व्हा”, पोलीस आयुक्तांसमोरच अजित पवारांनी उपायुक्तांना दिला सल्ला

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दहिफळे यांच्या पथकाने केली.

Back to top button