भाजपच्या बैलगाडा शर्यतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची भिर्रर्र ! | पुढारी

भाजपच्या बैलगाडा शर्यतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची भिर्रर्र !

गणेश विनोदे

वडगाव मावळ : चिखली येथे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीत मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैलगाड्यांनी पहिल्या व दुसर्‍या क्रमांकात बाजी मारल्याने भाजपच्या बैलगाडा शर्यतीत राष्ट्रवादीच्या बैलगाड्यांच्या बारी बसल्याची चर्चा रंगली आहे.

आमदार महेश लांडगे यांनी चिखली, जाधववाडी येथे भव्य स्वरूपात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या शर्यतीचा समारोप झाला. भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून ओळ्खल्या गेलेल्या या शर्यतीत सुमारे बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता.

शाळा सुरू होणार; पण लसीचे काय?

अशा पद्धतीने झालेल्या या शर्यतीत मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते व नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीच्या सचिवपदी निवड झालेले रामनाथ वारिंगे यांच्या बैलगाड्याने सेमीफायनल मध्ये 11.30 सेकंदात घाट पार करून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, फायनलमध्येही 11.22 सेकंदात घाट पार करून सर्वात आतली बारी म्हणून बाजी मारली.

तसेच, मावळातील राष्ट्रवादीचे दुसरे नेते जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर यांच्या बैलगाड्याने फायनलमध्ये 11.36 सेकंदात घाट पार करून पहिल्या क्रमांकात बाजी मारली. त्यामुळे शर्यतीच्या पहिल्या क्रमांकात आलेल्या पाच बैलगाड्यांमध्ये मावळातील वारिंगे व वायकर या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बाजी मारली.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; 13 जूनपासून गजबजणार वर्गखोल्या

तर, मावळमधील राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या बैलगाड्यानेही फायनलमध्ये 11.40 सेकंदात घाट पार करून दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे पहिल्या क्रमांकात आलेले वारिंगे व वायकर हे जेसीबीचे मानकरी ठरले तर आमदार शेळके हे बोलेरो चारचाकी गाडीचे मानकरी ठरले. एकंदर भाजपच्या आमदारांनी भरवलेल्या या भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीत मावळातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैलगाड्यांनी बाजी मारल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

1200 बैलगाड्यांचा सहभाग

पाच दिवस भव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या शर्यतीत सुमारे 1200 बैलगाड्यांचा सहभाग होता. यामध्ये 12 सेकंदांच्या आत आलेल्या सुमारे 85 बैलगाड्यांची सेमीफायनल घेण्यात आली. सेमीफायनलमध्ये प्रथम आलेल्या 30 बैलगाड्यांची पुन्हा फायनल घेण्यात आली.

Back to top button