सोमेश्वर पतसंस्थेत ४७ लाखांचा अपहार ; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

सोमेश्वर पतसंस्थेत ४७ लाखांचा अपहार ; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

बारामती ; पुढारी वृत्तसेवा :  सोमेश्वर पतसंस्थेत अपहार सोमेश्वरनगर (ता.बारामती जि. पुणे) परिसरात सहकारी संस्थेत घोटाळ्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. श्री. सोमेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. करंजेपूल या पतसंस्थेमध्ये तत्कालीन सचिवाने नातेवाईक व इतरांच्या नावे बेअरर चेकद्वारे कर्ज देत संस्थेची सुमारे ४७ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात फसवणूकीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सोमेश्वर पतसंस्थेत अपहार प्रकरणी बारामतीच्या सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक धनंजय चंद्रकांत गाडे यांनी याबाबत फिर्य़ाद दिली आहे.

संस्थेचे तत्कालीन सचिव संपत गंगाराम बनकर, शत्रुघ्न ज्योतीराव जगताप, गणेश गंगाराम बनकर, गंगाराम मारुती बनकर (सर्व रा. वाणेवाडी, ता. बारामती)

रंजना प्रकाश होले, प्रकाश रामभाऊ होले (रा. बेटवाडी, ता. दौंड जि. पुणे), महेश मारुती जाधव (रा. पाडेगाव, ता. खंडाळा, जि. सातारा), दत्तात्रय ज्ञानदेव नेवसे व बाळासो रामभाऊ नेवसे (रा. नेवसेवस्ती, मोरगाव, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.’

जिल्हा उपनिबंधकांचे गाडेंना लेखापरीक्षणाचे आदेश

त्यांनी २ सप्टेंबर २०२० ते १२ मार्च २०२१ या कालावधीत संस्थेचे लेखापरीक्षण केले. यावेळी विद्यमान सचिव संदीप महादेव खैरे यांनी त्यांना आवश्यक ती कागदपत्रे पुरवली.

या लेखापरीक्षण कालावधीमध्ये संस्थेचे सचिव म्हणून संपत बनकर हे काम पाहत होते.

त्यांनी त्यांच्या कालावधीत अपहार केल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले. बनकर यांनी या कामी तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळ, सभासद यांची फसवणूक  करत कार्यक्षेत्राबाहेरील सभासद व नातेवाईक कर्जदारांना बेअरर चेकने कर्जवाटप केल्याचे लेखापरीक्षणात दिसून आले.

कर्जाची रक्कम तत्कालीन सचिव बनकर यांनी पुणे जिल्हा बॅंकेच्या सोमेश्वरनगर येथील शाखेतून चालू खात्यावरून बेअरर चेकने काढली.

यात शत्रुघ्न जगताप यांच्या नावे 31 मार्च 2010 रोजी 1 लाख 71हजार, स्वतः संपत बनकर यांच्या नावे याच दिवशी तीन वेगवेगळ्या चेकद्वारे प्रत्येकी 4 लाख 75 हजार, प्रकाश होले यांच्या नावे याच दिवशी दोन चेकद्वारे प्रत्येकी 6 लाख 17 हजार 500 रुपये,महेश जाधव व संपत बनकर यांच्या नावे 4 लाख 75 हजार रुपये, चंद्रकांत नवले व संपत बनकर यांच्या नावे 4 लाख 75 हजार रुपये,दत्तात्रय नेवसे व संपत बनकर यांच्या नावे 4 लाख 75 हजार रुपये, बाळासो नेवसे व संपत बनकर यांच्या नावे 4 लाख 75 हजार रुपये काढण्यात आले.

बनकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सचिव म्हणून काम पाहत असताना संस्थेचे दप्तरी कामकाज, रोख व बँक शिलकेची जबाबदारी त्यांच्यावर हाेती.

यावेळी  त्‍यांनी पदाचा दुरुपयोग करत स्वतःसाठी व नातेवाईक, सभासद यांच्या फायद्यासाठी संस्थेची फसवणूक करत संस्थेचे  नुकसान करत अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सहकारातील फसवणूकीचे सोमेश्वरनगर होतेय केंद्र

सोमेश्वरनगर भागात यापूर्वी सोसायट्या, पतसंस्था, बँक घोटाळ्यांचे अनेक प्रकार घडले आहेत. बारामती तालुक्यात सर्वाधिक सहकारी संस्थांचे जाळे येथे आहे.

परंतु सहकारातील फसवणुकीचे सोमेश्वरनगर हे केंद्र होवू लागले आहे. परिणामी सामान्य सभासदांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

पहा व्हिडिओ : ज्ञानकौशल्य आणि वागणूक हीच यशाची गुरुकिल्ली

Back to top button