डॉक्टर पत्नीचा जातीवाचक छळ; सासरच्यांवर गुन्हा | पुढारी

डॉक्टर पत्नीचा जातीवाचक छळ; सासरच्यांवर गुन्हा

पुणे : लग्नाच्या 17 वर्षांनंतर पतीसह सासरच्यांचा जातीवाचक छळ असह्य झालेल्या डॉक्टर विवाहितेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पती महेंद्र सुमंत बडदे (41), सासू उषा सुमंत बडदे (70), दीर संतोष सुमंत बडदे (45) आणि नणंद स्वाती लोणकर यांच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळ, संगनमताने मारहाण, धमकावणे तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 2005 त 29 मे 2022 दरम्यान हांडेवाडी रोड हडपसर येथील रुणवाल सिगल व हडपसर येथील मंत्री मार्केट येथील सोसायटीत घडला. महेंद्र बडदे यांचा डॉक्टर करुणा यांच्यासोबत 2005 मध्ये प्रेमविवाह झाला.

सासरी नांदत असताना संशयित आरोपी यांनी फिर्यादी ही अनुसूचित जातीची आहे, हे माहिती असताना तिला जातीवाचक शिवीगाळ केली. तिचा मानसिक छळ केला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली. महेंद्र याने फिर्यादीला दारू पिण्यासाठी पैसे मागत जातिवाचक शिवीगाळ करून गोंधळ घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button