पुणे : रिक्षा परवाना बंद करण्याचा पुणे ‘आरटीओ’चा ठराव मंजूर | पुढारी

पुणे : रिक्षा परवाना बंद करण्याचा पुणे ‘आरटीओ’चा ठराव मंजूर

प्रसाद जगताप

पुणे : पुणे शहराची लोकसंख्या पाहता त्यापेक्षा अधिक रिक्षा परवान्यांचे वाटप पुणे आरटीओकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आता रिक्षा परवाना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संदर्भात पुणे आरटीओकडून शासनाला देण्यात आलेल्या ठरावाला नुकतीच मंजुरी मिळाली. त्यामुळे आता लवकरच रिक्षा परमिट बंद होणार आहे.

पुणे शहराची लोकसंख्या 40 लाखांच्या घरात आहे. येथे नागरिक सार्वजनिक वाहतूक आणि रिक्षा वाहतूक यांच्यासह खासगी वाहतुकीचाही वापर करतात. शहरात लोकसंख्येच्या तुलनेत रिक्षाची संख्या कमी असल्यामुळे शासनाने 2017 साली रिक्षा परवाना वाटप खुले केले. 2017 ते 2022 या 06 वर्षांच्या कालावधीत पुणे आरटीओ कार्यालयातून आतापर्यंत 36 हजार 519 परवान्यांचे वाटप करण्यात आले आहे.

त्यामुळे पुण्यातील अनेक बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. मात्र, सध्याच्या घडीला रिक्षाच्या परमिटची संख्या वाढली असून, रिक्षाचालकांमध्ये स्पर्धात्मक स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी बहुतांश रिक्षाचालकांना अनेकदा भाडे मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे रिक्षा संघटनांकडूनच खुला करण्यात आलेला रिक्षा परवाना बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अशी वाढत गेली संख्या

  • 2017 पूर्वी पुण्यातील रिक्षा परमिट संख्या – 46 हजार 04
  • 2017 नंतर वाढलेली रिक्षा परमिट संख्या – 36 हजार 519
  • 2022 मध्ये शहरात असलेले एकूण रिक्षा परमिट -82 हजार 523
  • परमिटमधून मिळालेला महसूल -36 कोटी 51 लाख 90 हजार रुपये

खुला रिक्षा परवाना बंद करण्याची आमची गेल्या तीन वर्षांपासूनची मागणी आहे. प्रमाणापेक्षा जास्त परवाना वाटप झाले आहे. रिक्षाचालकांमध्येच स्पर्धा सुरू झाली आहे. याचा फायदा काही खासगी वाहतूकदार उचलत आहेत. या संदर्भातील मागणी आम्ही विविध स्तरावर केली आहे. आरटीएलासुद्धा (प्रादेशिक परिवहन प्राधिकरण) याबाबतचा ठराव दिला आहे.

            – नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत

शहरात लोकसंख्येला पुरेशी रिक्षासंख्या झाली आहे. या संदर्भातील ठराव शासनाला देण्यात आला होता. तो मंजूर झाला आहे. वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यावर लगेचच रिक्षा परवाना वाटप बंद करण्यात येईल.

                                 -डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

 

Back to top button