

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वारंवार आवाहन करूनदेखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या 25 दिवसांमध्ये 30 हजार 217 अकृषक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यातील 7 लाख 80 हजार 611 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे 200 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 26) व रविवारी (दि. 27) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती 6 लाख 79 हजार 378 ग्राहकांकडे 134 कोटी 34 लाख रुपये, वाणिज्यिक 79 हजार 418 ग्राहकांकडे 45 कोटी 12 लाख रुपये आणि औद्योगिक 11 हजार 815 ग्राहकांकडे 20 कोटी 79 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या 25 दिवसांत 30 हजार 217 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजग्राहकांना वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. थकबाकीदार शेजार्यांकडून किंवा इतर ठिकाणांहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे.