हिरा सरवदे
पुणे : शहरातून वाहणार्या मुळा-मु्ठा नद्यांच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या संगमवाडी ते बंडगार्डन या पॅकेजचे काम 20 टक्के पूर्ण झाले आहे. धरणे भरल्यानंतर नदीपात्रात जरी पाणी सोडले, तरीही या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, नदीत पाणी वाढल्यानंतर बंडगार्डन ते मुंढवा या पॅकेजचे काम बंद ठेवावे लागणार आहे.
गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातून वाहणार्या मुळा-मुठा नदीकाठचे 44 किमी लांबीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पास 2018 ला मान्यता देण्यात आली असून, यासाठी 4 हजार 727 कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्पाचे काम 11 टप्प्यांत करण्यात येणार असून, 11 पैकी 3 टप्पे प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. एका टप्प्यासाठी येणारा 700 कोटी रुपये खर्च महापालिकेच्या निधीतून व उर्वरित खर्च पीपीपी तत्त्वावर करण्यात येणार आहे.
प्रकल्पातील टप्पा क्र. 9 मध्ये संगमवाडी ते बंडगार्डन यादरम्यानचे नदी सुशोभीकरणाचे काम बी. जे. शिर्के कंपनीकडून केले जात आहे. सध्या प्रकल्पाचे काम बंडगार्डन येथील गणेश घाट आणि बोट क्लब, असे नदीच्या दोन्ही बाजूंनी सुरू असून, आजवर 20 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका अधिकार्यांनी केला आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये धरणे भरल्यानंतर दोन्ही नद्यांना पाणी सोडले जाते. हे पाणी संगमवाडी येथे एकत्र येऊन पूर्वेस जाते. त्यामुळे संगमवाडीपासून नदीचा वेग आणि नदीपात्रातील पाणी वाढते.
यंदाही नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर नदी सुशोभीकरणाच्या कामाचे काय होणार? याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते युवराज देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, 'संगमवाडी ते बंडगार्डन यादरम्यानच्या 300 मीटर लांबीच्या पथदर्शी टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या पॅकेजमध्ये जे काम सुरू आहे, ते पूररेषेच्या वर आलेले आहे. त्यामुळे नदीला पाणी जरी सोडले, तरी प्रकल्पाचे काम बंद होणार नाही. तसेच जेथे काम सुरू आहे तेथे पाण्यामुळे नुकसान होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
बंडगार्डन ते मुंढवा यादरम्यानच्या पॅकेजचे काम पीपीपी तत्त्वावर करण्यात येत आहे. सध्या या पॅकेजमध्ये टो-वॉलसाठी मुरमाचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. नदीला पाणी सोडल्यानंतर या ठिकाणी काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हे काम पावसाळा संपेपर्यंत बंद ठेवावे लागणार आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट, बंडगार्डन येथे सध्या बॅरेज आहेत. आणखी एक बॅरेज गरवारे कॉलेजमागील नदीपात्रात बांधण्यात येणार आहे. या बॅरेजमुळे नदीपात्रात एक ते दीड मीटर पाण्याची पातळी कायम राखली जाईल. यामुळे शहरातील बहुतेक नदीपात्रांत कायम पाणी राहण्यास मदत होणार आहे. या बॅरेजचे गेट खालील बाजूस राहणार असून, अखंडित पाण्याचा प्रवाह राहील तसेच गाळ कमीत कमी राहील.
नदीपात्रालगत सध्याच्या घाटांमध्ये आणखी 50 नवीन घाट विकसित करण्यात येणार आहेत. नदीपात्रात उतरण्यासाठी सध्या 50 ठिकाणांहूनच रस्ते अथवा पायर्या आहेत. आखणी 50 ठिकाणी पायर्या व उतरण्याचे मार्ग तयार करण्यात येणार ओहत. ज्या ठिकाणी नदीकाठावर कमी जागा मिळणार आहे, त्या ठिकाणी नदीपात्राच्या कडेला भिंत उभारून साधारण 30 मीटर रुंदीचा भाग व वरील अॅमेनिटी विकसित करण्यासाठी वापरण्यात येईल. प्रामुख्याने मुठा नदीपात्रात नागरीकरण झालेल्या भागात या भिंती उभाराव्या लागणार आहेत. नदीपात्राकडे जाण्यासाठी 300 ते 500 मीटर अंतरावर 'एन्ट्रन्स'ची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी रस्ते व अन्य पर्याय महापालिका उपलब्ध करून देणार आहे.
हेही वाचा