

Pune Politics: पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने पुणे जिल्ह्यातील एकूण 21 पैकी 10 विधानसभा मतदारसंघांतून तब्बल 20 जणांनी बंडखोरी केल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. काही बंडखोरांचे बंड शमविण्यात महायुती व महाआघाडीच्या नेत्यांनी यश मिळविले असून मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी आणखी काही जणांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
शहरात शिवाजीनगर, पर्वती, कसबा आणि हडपसर या मतदारसंघांतून बंडखोरांचे पेव फुटले आहे. शिवाजीनगर मतदारसंघातून दत्ता बहिरट यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेले माजी नगरसेवक मनीष आनंद (काँग्रेस) यांनी, तर पर्वतीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने निराश झालेले आबा बागूल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून बंडाचा झेंडा उभारला आहे.
कसब्यातही माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अपक्ष म्हणून बंड केले आहे, तर हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आनंद अलकुंटे यांनी बंडखोरी केली. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आत्तापर्यंत शरद सोनावणे (शिवसेना शिंदे गट) आणि आशाताई बुचके (भाजप) यांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. इंदापूर मतदारसंघातून प्रवीण माने (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पुरंदर विधानसभा मतदारसंघातून संभाजी झेंडे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), जालिंदर कामठे (भाजप), दिगंबर दुर्गाडे, दत्ता झुरंगे व गणेश जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांनी बंडखोरी केली आहे.
भोर विधानसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चांदेरे, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन झेंडे आणि प्रचारप्रमुख किरण दगडे (भाजप), शांताराम कटके व माजी नगराध्यक्ष बादशहा शेख (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये बंडखोरी ठरणार डोकेदुखी
पिंपरी मतदारसंघात महायुतीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. या मतदारसंघातून सोमवारी नऊ जणांनी अर्ज भरला. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला; तसेच बंडखोरीचा निर्धार करीत ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या समर्थकांसह अर्ज सादर केला आहे. चिंचवड मतदारसंघात आतापर्यंत 65 जणांनी एकूण 167 अर्ज नेले आहेत. त्यापैकी 14 जणांनी अर्ज भरले आहेत.
भोसरी मतदारसंघातून 51 जणांनी अर्ज नेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 10 जणांनी अर्ज भरले आहेत. भोसरी मतदारसंघात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंडखोरांची समजूत काढण्यास वरिष्ठ व स्थानिक पातळीवरील नेत्यांना यश न आल्यास बंडखोरी अटळ आहे. ही बंडखोरी डोकेदुखी ठरणार अहे.