

नवी दिल्ली : Marathi Sahitya Sammelan |पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.२१) दिल्लीमध्ये ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी बोलताना शरद पवार म्हणाले की, ७० वर्षांपूर्वी दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते. त्याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केले होते. यावेळी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी संमेलनाचे उद्घाटन करत आहेत. संमेलनाच्या उद्घाटनासाठी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. त्यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
आषाढी वारी प्रमाणे साहित्य संमेलनाला लोक येतात, हे आपण पाहतो. एका महिला साहित्यिकाला यंदाच्या साहित्य संमेलनात ही संधी मिळाली, यासाठी महामंडळाचे आभार त्यांनी व्यक्त केले. अनेक वेळा राजकीय लोक आणि साहित्याचा काय संबंध आहे, याची चर्चा होते. मात्र अनेक राजकारणी चांगले साहित्यक असल्याचे आपण पाहिले आणि काही साहित्यिकही विधिमंडळात आल्याचे आपण पाहिले, असेही शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी स्वतः लिहिलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचा संदर्भही दिला आणि काही ऐतिहासिक गोष्टींवर प्रकाश टाकला.