

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या आरोग्य आकडेवारीनुसार, राज्यात क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु, केंद्र सरकारच्या निक्षय मित्र योजनेंतर्गत मिळणारा प्रतिसाद मात्र कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. क्षयरोगाचे 2 लाख रुग्णांपैकी केवळ 36 हजार जणांनाच मदत मिळाली आहे. राज्यातील क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या 2015 मध्ये 1 लाख 70 हजार 845 इतकी होती. रुग्णसंख्या 2022 मध्ये 2 लाख 33 हजार 253 वर पोहोचली आहे.
मात्र, निक्षय मित्र योजनेंतर्गत सुमारे 2974 देणगीदारांकडून केवळ 36 हजार रुग्णांनाच मदत मिळत आहे. 2022 च्या अहवालानुसार, मुंबई (65473), ठाणे (33050), पुणे (18453), आणि नागपूर (10565) मध्ये सर्वांत जास्त क्षयरोग रुग्णांची नोंद झाली. कोरोना महामारीदरम्यान, रुग्णांच्या नोंदीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. केंद्र सरकारचा निक्षय मित्र कार्यक्रम 9 सप्टेंबर 2022 रोजी गरजू क्षयरुग्णांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आला. योजनेंतर्गत नाव नोंदवलेल्या एकूण रुग्णांपैकी केवळ 35 टक्के रुग्णांना मदत मिळाली आहे.
काय आहे योजना?
योजनेंतर्गत प्रत्येक रुग्णाला 700 रुपये किमतीचा आहार असलेली अन्नाची किट मिळते. यामध्ये 3 किलो धान्य, 250 मिली वनस्पती तेल, शेंगदाणे किंवा दूध पावडर (एक किलो) किंवा 6 लिटर दूध यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, भाज्या आणि फळे, व्हिटॅमिन बी आणि मिनरल्स सप्लिमेंट्स दिल्या जातात. रुग्ण दत्तक घेऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती निक्षय मित्र योजनेंतर्गत अर्ज भरू शकते.
अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. मात्र, योजनेला कमी प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम केवळ रुग्णांची काळजी घेण्यासाठीच नव्हे, तर क्षयरोगाच्या रुग्णांभोवती असलेला कलंक दूर करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
– डॉ. सुनीता गोलाईत, सहसंचालक, आरोग्य सेवा