

Pune Gultekdi Market Yard 2.5 kg Mango
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मंगळवारी (दि.१३) चक्क दोन ते अडीच किलो वजनाच्या दीडशे किलो आंब्याची आवक झाली. कर्नाटकातून दाखल झालेल्या या आंब्याच्या किलोला 60 ते 70 रुपये भाव मिळाला. फळबाजारातील डी. बी. उरसळ अॅण्ड सन्स फर्मवर ही आवक झाली. कर्नाटक परिसरातून बाजारात दाखल झालेल्या या आंब्याच्या आकाराची चर्चा मार्केट यार्डात चांगलीच गाजली.
कर्नाटकात या आंब्याला खुदादाद या नावाने ओळखले जाते. या आंब्याची कोय लहान तसेच साल राहते. तसेच गर अधिक प्रमाणात असतो. याची गोडी साधारण असते. मंगळवारी बाजारात वीस ते तीस किलोच्या पाच क्रेटमधून ही आवक झाली. यामध्ये आंब्याचे सरासरी वजन हे दोन ते अडीच किलो राहिले. त्याची लष्कर परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केल्याची माहिती अडतदार रोहन उरसळ यांनी दिली.