अपुर्‍या मनुष्यबळाचा प्रशासनावर ताण: सिंहगड क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी हैराण; समाविष्ट गावांमुळे हद्दीत वाढ | पुढारी

अपुर्‍या मनुष्यबळाचा प्रशासनावर ताण: सिंहगड क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी हैराण; समाविष्ट गावांमुळे हद्दीत वाढ

सिंहगड रोड : पुढारी वृत्तसेवा

सिंहगड क्षेत्रीय कार्यालयात असलेली रिक्त पदे व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे उपलब्ध मनुष्यबळावर सातत्याने ताण पडत असल्याचे दै. पुढारीच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

निवडणूक संदर्भातील कामासाठी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केल्याने उपलब्ध अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये क्षेत्रीय कार्यालयाचा गाडा हाकण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सिंहगड क्षेत्रीय कार्यालयांच्या आकृतिबंधानुसार सिंहगड क्षेत्रीय कार्यालयात 765 पदांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या घडीला केवळ 443 पदांवर कर्मचारी कार्यरत असून, 332 पदे रिक्त आहेत. त्यातच पालिका हद्दीत पाच नवीन गावांची भर पडल्याने सुमारे 3290 हेक्टर क्षेत्राची वाढ होऊन सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाची हद्द तब्बल 5755 हेक्टर एवढी झाली आहे.

एटीएसची पुण्यात मोठी कारवाई: जुनेद मोहम्मदला टेरर फंडिंगप्रकरणी दापोडीमधून अटक

आकृतिबंधानुसार 281 पदांची आणखी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या जोरावर नागरिकांना नागरी सुविधा कशा प्रकारे पुरवायच्या, असा प्रश्न निर्माण होत आहे. कनिष्ठ विद्युत अभियंता, विद्युत पर्यवेक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक (हिवताप), वाहन चालक, सुरक्षा रक्षक, मिस्त्री, फिटर, माळी, सुतार, नगर अभियंता ड्रेनेज बिगारी ही सर्व पदे सध्या रिकामी असून, येथील नियुक्त्या रखडलेल्या आहेत.

सीपीआरमधील डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला प्रतिनियुक्तीवर

क्षेत्रीय कार्यालयासाठी एकच वाहन

क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित सध्या केवळ एकच चारचाकी वाहन उपलब्ध आहे. आरोग्य विभाग, स्टोअर विभाग, विद्युत विभाग, आकाशचिन्ह व इतर अशा सर्वच कामांसाठी एकच वाहन उपलब्ध असल्याने उपलब्ध वाहन सर्वच विभागाचा बोजा सहन करत आहे. वाहनाच्या मागणीसाठी पालिकेच्या मोटार वाहन विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्यात येऊनदेखील दखल घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे.

Back to top button