पुणे : पीएमपीचे ग्रामीण भागातील १३ मार्ग बंद ; एसटी बससेवा सुरू झाल्याने निर्णय | पुढारी

पुणे : पीएमपीचे ग्रामीण भागातील १३ मार्ग बंद ; एसटी बससेवा सुरू झाल्याने निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एसटी संप काळात सुरू करण्यात आलेले पीएमपीचे सर्वच्या सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील आदेश नुकतेच पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. त्यामुळे एसटी-पीएमपीत सुरू असलेली स्पर्धा आता काही प्रमाणात का होईना, संपुष्टात येईल, असे चित्र दिसत आहे.

पीएमपीने एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर १३ मार्ग सुरू केले होते. हे मार्ग बंद करण्यासाठी एसटी महामंडळाने पीएमपीला अनेकदा पत्र पाठविले. मात्र, पीएमपी आणि एसटी महामंडळामध्ये यावरून तू तू मै मै सुरू होते. विनाकारण दोन सार्वजनिक वाहतूक पुरविणार्‍या संस्थांमध्ये होणारी स्पर्धा थांबविण्यासाठी अखेर पीएमपी प्रशासनानेच माघार घेत, एसटी संप काळात सुरू केलेले सर्व मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएमआरडीए हद्दीबाहेरील १३ मार्ग आता बंद होणार आहेत.

हे मार्ग आता बंद…

१) हडपसर – यवत
२) स्वारगेट – वेल्हा
३) वाघोली – राहू
४) वाघोली – रांजणगाव
५) चाकण – शिक्रापूर
६) सासवड – जेजुरी
७) पुणे – निरा
८) भोसरी – जुन्नर
९) भोसरी-मंचर – घोडेगाव
१०) सासवड – वीर
११) स्वारगेट – पानशेत
१२) कात्रज – सारोळा
१३) स्वारगेट – खारवडे

आणखी काही मार्ग सुरूच…

– ग्रामीण हद्दीत सुरू असलेले पीएमपीचे एकूण मार्ग – ९२ (दोन्ही मनपा)
– पूर्वीचे ग्रामीण हद्दीतील मार्ग – ५७
– नव्याने सुरू करण्यात आलेले मार्ग – ३५
– शहरात धावत असलेल्या गाड्या संख्या – १५९०
– ग्रामीण भागात धावत असलेल्या गाड्या संख्या – ४२५

एसटी संप काळात सुरू केलेले मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत. लवकरच पीएमपीची ग्रामीण भागात सुरू असलेली सेवा बंद होईल.
– लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

 

पीएमपीने ग्रामीण मार्गावर बस बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. विनाकारण दोन सार्वजनिक वाहतूक सेवेत स्पर्धा होत होती. ती आता कमी झाली आहे. एसटी महामंडळातर्फे आता पीएमपीने बंद केलेल्या मार्गावर आवश्यक तेवढ्या फेर्‍या वाढवून पुरविण्यात येतील.
– ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

हेही वाचलंत का ? 

Back to top button