आता मी ड्रायव्हर म्हणून बसतो, साहेबांना कंडक्टर करतो अन् सुप्रिया तिकीट काढेल : अजित पवारांनी घेतली कार्यकर्त्याची फिरकी | पुढारी

आता मी ड्रायव्हर म्हणून बसतो, साहेबांना कंडक्टर करतो अन् सुप्रिया तिकीट काढेल : अजित पवारांनी घेतली कार्यकर्त्याची फिरकी

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : कार्हाटीच्या शाळेत जाण्यासाठी बस सुरु करा, अशी मागणी भिलारवाडी येथील कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. आता ड्रायव्हर म्हणून मी बसतो, साहेबांना (शरद पवार) कंडक्टर करतो, आणि सुप्रियाला तिकिट काढायला लावतो, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्याची फिरकी घेतली.  अरे बाबा आधीची परिस्थिती बघ, आत्ताची बघ, परिस्थिती बदलत चालली आहे, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्याला सुनावले.

पवार म्हणाले की, शरद पवार पुण्यात शिकायला होते, तेव्हा बारामतीहून एसटीने डबा जायचा. तो पोहोचेपर्यंत डबा खराब व्हायचा. आता तशी परिस्थिती राहिलीय का ? आपल्या भागाचा विकास झाला आहे. जरा आजूबाजूच्या फलटण, दौंड, इंदापूर तालुक्यात जाऊन बघा, तिथल्या आणि इथल्या परिस्थितीत किती फरक आहे? योजनांद्वारे मिळणाऱ्या पाण्यांचे दर कमी करा, अशी मागणी एका कार्यकर्त्याने केल्यावर दुसऱ्याने लागलाच तो विषय पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावर पवार यांनी यातल्या एकाला खासदार अन् एकाला आमदार करा, यांना वाटतं आम्ही काहीचं काम करत नाही, अशा शब्दांत त्यांची हजेरी घेतली.

‘ये बाब गप्प बस ना. झाकली मूठ सव्वा लाखाची राहू दे’

बारामतीला किती निधी आला आहे ते बघा. आता किती निधी आला त्याचा आकडा मी सांगत नाही. नाही तर माध्यमात ‘ब्रेकिंग’ सुरु होईल, असे अजित पवार म्हणाले, त्यावर एकाने लागलीच किती निधी आला ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर पवार यांनी ‘ये बाब गप्प बस ना. झाकली मूठ सव्वा लाखाची राहू दे’, अशी मिश्किल टिपण्णी केली.

टाकायची बंद कर

एका कार्यकर्त्याला पवार यांनी यावेळी सल्ला दिला. अरे तु पाणी बघून ऊस लाव. तू सोसायटीची निवडणूक जिंकली म्हणून कळालं. त्यावर त्याने दादा, १३-० करून टाकलं, असे उत्तर दिले. पवार यांनी त्याला हो. तुझं कौतुक आहे;  पण कधी कधी टाकतो, ते बंद कर, असा त्‍यांनी सल्ला दिला. त्यावर मोठा हशा पिकला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button