छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाचे कार्य सुरू रहावे : शरद पवार

किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर शरद पवार, प्रविण गायकवाड व अन्य.
किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर शरद पवार, प्रविण गायकवाड व अन्य.

नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा

काही लोकांनी लेखणीचा गैरवापर करून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रविण गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी इतिहासाचा मागोवा घेत सर्वसामान्य जनतेला शिवशंभो छत्रपतींचा इतिहास सांगण्याचे कार्य केले. या प्रेरणादायी इतिहासाचे कार्य असेच पुढे चालू ठेवावे, असे आवाहन खा. शरद पवार यांनी केले.

१४ मे रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर किल्ले पुरंदरची पाहणी व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शरद पवार आले होते. यावेळी ते बोलत होते.

भारतीय लष्कराने किल्ले पुरंदरवर अनेक सुधारणा केल्या आहेत. त्याबद्दल भारतीय लष्कराचे जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. देशातील अठरापगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रयतेच्या मदतीने स्वराज्याच्या शत्रूशी जबरदस्त संघर्ष करत स्वराज्य रक्षण करण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनी केले, असे देखील यावेळी शरद पवार म्हणाले.

यावेळी आमदार संजय जगताप, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अशोक टेकवडे, विजय कोलते, संभाजी झेंडे, सुदाम इंगळे, बबूसाहेब माहूरकर, दत्तात्रय झुरंगे, गणेश जगताप, दत्ताआबा चव्हाण, गौरी कुंजीर, प्रदिप पोमण आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, कार्याध्यक्ष सुधीर भोसले, उपाध्यक्ष छगन शेरे, प्रदेश संघटक अमोल काटे, पुणे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, कार्याध्यक्ष संतोष हगवणे आदींसह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केले. प्रास्तविक अजयसिंह सावंत यांनी केले. सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले. आभार संतोष हगवणे यांनी मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news