पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या विजापूरच्या आदिलशाहीतील सरदार अफझलखानाचा वाघनखांनी कोथळा काढून त्याचा ऐतिहासिक प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला. छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या या ऐतिहासिक प्रसंगावर आधारित तब्बल 18 फुटी शिल्प प्रतापगडावर लवकरच बसविण्यात येणार आहे. पुण्यातील मूर्तिकार
दीपक थोपटे यांच्या चित्रकल्पक आर्ट स्टुडिओत हे शिल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, केवळ रंगकाम शिल्लक आहे. छत्रपती शिवरायांचे शौर्य, धाडस, पराक्रमाची साक्ष देणारे हे शिल्प येत्या एक-दोन महिन्यांमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवण्याची शक्यता आहे.
स्वराज्यावर आलेले अफझलखान नावाचे मोठे संकट शिवरायांना थोपवायचे होते. त्यांनी चातुर्याने अफझलखानाला जावळीच्या खोर्यात म्हणजेच प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून घेतले. या ठिकाणी शिवरायांनी
अफझलखानाचा चातुर्याने कसा वध केला, हे या शिल्पातून साकारण्यात आले आहे. या शिल्पातून शिवरायांचे धैर्य, आपल्या सख्ख्या भावाला अफझलखानाने मारले याचा राग, शिवरायांचे चातुर्य, चपळाई आणि त्यांची ताकद हे दाखवले आहे.
शिवरायांनी अफझलखानाच्या मिठीतून सुटण्यासाठी त्याच्या पोटात वाघनखे घुसवली. त्यामुळे अफझलखानाची मिठी सैल झाली. चातुर्याने शिवरायांनी आपल्या बिछवा बाहेर काढून अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला. त्यामुळे अफझलखान आक्रोश करू लागला. त्याचे हावभाव, शिवरायांच्या चेहर्यावरील मुद्रा या शिल्पात बारीक-सारीक पद्धतीने साकारण्यात आलेली आहे.
असा आहे पुतळा
शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगणारा हा अफझलखान वध पुतळ्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून तयार करण्यात आलेला हा पुतळा 18 फुटांचा आहे. हा पुतळा सध्या पुण्यात आहे. यामध्ये छत्रपती शिवरायांची उंची 13 फूट आहे; तर शरीराने बलाढ्य असणार्या अफझलखानची उंची 15 फूट आहे.
यामध्ये अफझलखानाने शिवरायांवर केलेल्या वारामुळे चिलखत दिसत असल्याचेदेखील दिसून येत आहे. पुतळ्याचे एकूण वजन 7 ते 8 टन असणार आहे. या पुतळ्याचे काम अगदी रेखीव असून त्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागलेला आहे. या कामासाठी दीपक थोपटे यांच्याबरोबर 15 जणांच्या टीमने काम केले आहे.