पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तांदूळ आणि बटाटा खरेदी करून त्याची शहरात विक्री करण्याचे आमिष दाखवून एका दांपत्याची 24 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 2019 ते मे 2022 दरम्यान काळेवाडी येथे घडली.
अहमद साबिरअली शेख आणि त्याचा भाऊ सरफराज शेख (दोघेही रा. पश्चिम बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुमित अनिल विश्वास (36, रा. पंचनाथ चौकाजवळ, काळेवाडी) यांनी बुधवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी भाऊ हे फिर्यादी विश्वास यांच्या गावाकडे राहणारे आहेत. दरम्यान, त्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून गावाकडून कमी दरात बासमती तांदूळ व बटाटा खरेदी करून त्याची शहरात विक्री केल्यास जादा नफा मिळेल असे आमिष दाखवले.
सुरुवातीला फिर्यादी विश्वास यांच्याकडून नऊ लाख 30 हजार रुपये घेतले. तसेच, फिर्यादी यांच्या पत्नीस चिकन सेंटर सुरू करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 20 हजार रुपये घेतले.
त्यानंतर आरोपी सरफराज यांनी त्याच्या खात्यावर 15 लाख 30 हजार रुपये घेतले. अशाप्रकारे आरोपी भावांनी फिर्यादी यांची 24 लाख 80 हजार रुपये घेऊन पळून गेले.